सर्व व्यवस्थेवर वाढलाय ताण मल्टि टास्किंग स्टाफची गरज
प्रतिनिधी/ मडगाव
मडगावच्या कोविड हॉस्पिटलची क्षमता 220 खाटांची होती. ती आता पूर्णपणे भरली आहे. दररोज किमान दहा ते पंधरा कोरोनाबाधित रूग्ण दाखल होत आहेत. हे सर्व रूग्ण सिम्प्टॉमॅटिक असल्याने, त्यांची इतरत्र व्यवस्था करता येत नाही. मंगळवारी एकाच दिवशी 24 रूग्ण या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अतिदक्षता विभागही भरला असून काहींची व्यवस्था अन्यत्र करावी लागत आहे. स्वच्छता ठेवण्यासाठी मल्टि टास्किंग स्टाफची गरज निर्माण झाली आहे.
मंगळवारी दिवसभरात दहा जणांना कोविड हॉस्पिटलातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोविड हॉस्पिटलचा अतिदक्षता विभाग देखील फुल झाला असून अतिदक्षता विभागात सहा रूग्णांनाच ठेवणे शक्य होत आहे. सद्या अतिदक्षता विभाग फुल झाल्याने काही रूग्णांची हॉस्पिटलातच इतरत्र व्यवस्था करावी लागलेली आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेले आहे.
दोन डॉक्टर पॉझिटिव्ह
डॉ. एडविन गोम्स व त्यांच्या टिमने ब्रेक घेतल्यानंतर डॉ सुनंदा आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली नवीन टिम कोरोना हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे. या टिममधील दोन डॉक्टर अतिदक्षता विभागात कार्यरत होते, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे तपासणीत आढळून आले आहे. एक डॉक्टर मेडिसिन विभागातील तर दुसरा ऍनेस्थेशिया विभागातील आहे. या पूर्वी याच हॉस्पिटलातील तीन नर्सेस कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या.
मल्टि टास्किंग स्टाफची जरूरी
कोविड हॉस्पिटलात स्वच्छता ठेवण्यासाठी सद्या मल्टि टास्किंग स्टाफची जरूरी भासू लागली आहे. या ठिकाणी खाजगी मल्टि टास्किंग स्टाफ आला होता. मात्र, येथील परिस्थिती पाहून त्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने मल्टि टास्किंग स्टाफ नियुक्त करण्याची गरज निर्माण झालेली आहे. सद्या कोविड हॉस्पिटल फुल झाल्याने मल्टि टास्किंग स्टाफची कमतरता भासू लागली आहे. सद्या कोविड हॉस्पिटलसाठी डॉक्टरांची अतिरिक्त टीम तसेच इतर सर्व सुविधा सूसज्ज राखण्याची पाळी आलेली आहे.
भाजप आमदार अतिदक्षता विभागात
कोरोना पॉझिटिव्ह असलेले भाजपचे दक्षिणेतील एका आमदारांना सोमवारी रात्री अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कोविड हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली आहे. त्यांना 30 जून रोजी कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांची प्रकृती बऱयापैकी होती. त्यांनी आपल्या प्रकृतीची कल्पना मतदारसंघातील जनतेला देण्यासाठी आपला व्हिडियो व्हायरल केला होता. मात्र, सद्या ते कोरोनाशी संघर्ष करीत असून त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
कोरोना पॉझिटिव्ह मुलगा आला वडिलांच्या मदतीला
आमदारांच्या कुटुंबांला देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र ते असिम्प्टॉमॅटिक असल्याने त्यांना इतरत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र, सोमवारी त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचा मुलगा केअर टेकर म्हणून कोविड हॉस्पिटलात आला आहे. सद्या अतिदक्षता विभागात तो आपल्या वडिलाची देखभाल करीत आहे. वडिल व मुलगा दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याने दोघांवरही याच ठिकाणी उपचार केले जात आहेत.