प्रतिनिधी / मडगाव
मडगाव व आसपासच्या परिसरातील दीड दिवसांच्या श्री मूर्तीचे रविवारी विशेष गाजावाजा न होता विसर्जन करण्यात आले. यावेळी पावसाने ढगाआडच राहणे बहुतेक वेळ पसंत केले
मडगाव पोलीस स्थानक आणि पिंपळापेड मडगाव येथील श्री गणेश मूर्तीचे विसर्जन रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमाराला फातोर्डा येथे करण्यात आले.
दुपारी 3 वाजण्याच्या सुमाराला मडगाव पोलीस स्थानकाच्या आवारात असलेली श्रींची मूर्ती पूजा -अर्चा करुन विसर्जनासाठी बाहेर आणण्यात आली. मूर्ती एका वाहनामध्ये बसवून सर्वप्रथम पिंपळापेडजवळ नेण्यात आली.
तेथे पिंपळापेड येथील श्री गणेश मूर्ती सामील करुन घेऊन दोन्ही श्रीच्या मूर्ती फातोर्डा येथे नेण्यात आल्या. श्री दामोदर मंदिरासमोरील तळीत या दोन्ही मूर्ती विधीवत विसर्जीत करण्यात आल्या.
यावेळी फातोर्डा पोलिसांनी कडक पोलीस व्यवस्था ठेवली होती. त्यामुळे एकेक श्रीमूर्तीचे व्यवस्थीत विसर्जन करण्यास, विद्यमान स्थितीत, फातोर्डा पोलिसांनी व्यवस्थीत काम केले. मडगाव पोलीस विभागाचे उपअधीक्षक पौडवाल तसेच पोलीस निरीक्षक कपील नायक, पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांनी यावेळी प्रत्यक्ष लक्ष ठेवले.
रात्री उशिरापर्यंत श्रीच्या शेकडो मूर्तीचे या तळीत विसर्जन करण्यात आले.