कचरा व्यवस्थापनातील अडथळे दूर करण्याचे आश्वासन
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेच्या मुख्याधिकारीपदाची सूत्रे नुकतीच रोहित कदम यांनी अ?ाग्नेलो फर्नांडिस यांच्याकडून हाती घेतली. पदभार स्वीकारताना, नव्याने रूजू झालेले मुख्याधिकारी कदम यांनी कचरा व्यवस्थापनातील अडथळे दूर करण्यासाठी आपले प्रयत्न असतील असे सांगितले. तसेच जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि समस्या सोडविण्यासाठी पालिकेत तक्रार कक्ष स्थापन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
माझ्यासाठी हे नवीन आणि आव्हानात्मक पद आहे. मी यापूर्वी मुख्याधिकारी म्हणून काम केलेले आहे. परंतु सासष्टीचे ‘हॉट सीट’ असलेल्या मडगावातील पालिकेच्या पदाची सूत्रे हाती घेणे हे माझ्यासाठी नवीन आव्हान आहे, असे कदम यावेळी म्हणाले. नवीन मुख्याधिकाऱयांनी पालिकेचे कर्मचारी आणि नगरसेवक यांच्या तक्रारी समजून घेण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले आहे.
मी परिस्थिती आणि कर्मचारी यांच्याशी जुळवून घेण्याचा आणि सार्वजनिक समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करेन. पुढच्या आठवडय़ात समस्या सोडवण्याचा मार्ग कसा तयार करायचा याचा आराखडा तयार करणार, असे कदम यांनी स्पष्ट केले. मडगाव आणि फातोर्डा येथील जनतेच्या हितासाठी योग्य निर्णय घेण्याचे आणि पालिका क्षेत्रात येणाऱया कुडतरीतील गृहनिर्माण वसाहत क्षेत्राला न विसरण्याचे आश्वासन त्यांनी दिले. नवीन मुख्याधिकारी कदम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी उपनगराध्यक्षा दिपाली सावळ उपस्थित होत्या.