दहा ठिकाणांची निवड, निर्माल्य गोळा करण्याची सोय
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेने गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी खालील ठिकाणी प्रत्येकी दोन कचरापेटय़ा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे दहा सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन ठिकाणी निर्माल्य गोळा करण्याचीही सोय करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी दिली आहे.
बालभवनजवळ, चौगुले तळीजवळ, आना फॉन्त गार्डनजवळ, मालभाट येथील विहिरीजवळ (नगरसेवक सिद्धार्थ गडेकर), तळेबांद येथील श्री राममंदिराच्या जवळ (नगरसेविका लता पेडणेकर), लॉयोला ग्राऊंड, दामोदर कॉलेजजवळ, कालकोंडा कृषी फार्म (नगरसेविका दिपाली सावळ) या जाग्यांवर कचरापेटय़ा उपलब्ध करण्याचे ठरविण्यात आले आहे.
निर्माल्य आणि सुक्या कचऱयासाठी वेगवेगळी सोय करून सर्व ठिकाणी दोन डबे पुरवले जातील. जनतेने सहकार्य करावे आणि एका डब्यात फुले ठेवावीत आणि सुका कचरा आणि इतर वस्तू दुसऱया डब्यात टाकाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. एकदाच वापरता येणारे प्लास्टिक म्हणजे प्लास्टिक कप, वस्तू इत्यादी वापरणे टाळा. त्याऐवजी पत्रावळी आणि कापडी पिशव्या वापरा. कारण त्या विघटित होतात. त्या पर्यावरणास अनुकूल वस्तू आहे. गणेशोत्सवात पर्यावरण आणि निसर्गाबद्दल खूप आदर आहे, याकडे मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी लक्ष वेधले आहे. कोविड 19 च्या नियमावलीनुसार सुरक्षित अंतर राखणे, गर्दी टाळणे, सॅनिटायझर वापरणे आणि स्वतःची जबाबदारी स्वतः घेणे तसेच इतरांप्रती देखील दक्षता घेणे असे उपाय घ्यावेत, असे आवाहन मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी केले आहे. पालिकेने गणेशोत्सव सुरक्षितपणे आणि पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा होण्यासाठी एकमेकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.