प्रतिनिधी / मडगाव
मॉडेल मडगावच्या उमेदवार दिपाली दिगंबर सावळ यांनी प्रभाग 16 मध्ये 1490 मतांचे मताधिक्मय मिळवून संपूर्ण मडगाव नगरपालीका निवडणूकीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.त्यांना 1863 मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी अनिशा मोहन नाईक यांना 373 मतांवर समाधान मानावे लागले. प्रभाग 16 मध्ये एकूण 2331 मतदान झाले होते. त्यापैकी 95 मते बाद ठरली.
व्यवसायाने नर्स असलेल्या दिपाली सावळ यांनी आपल्या समाजसेवेने आपल्या प्रभागातील मतदारांशी आपुलकीचे नाते जोडले आहे. कालकोंडा, शिरवडे, चिंचाळ, आजाद नगर व खारेबांद परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग 16 मध्ये कोविड लॉकडाऊन व त्यानंतर त्यांनी घरोनघरी भेट देवून मदत पोचवली होती. आताही त्यांची समाजसेवा चालूच आहे.
मडगावचे आमदार दिगंबर कामत यांची मी ऋणी आहे. त्यांच्या पाठिंब्यानेच व आशीवार्दाने मी नगरसेवीका बनले. माझ्यासाठी त्यांनी प्रत्येक घराला भेट देऊन प्रचार केला. मॉडेल मडगावच्या जाहिरनाम्यातील सर्व योजना राबविण्यासाठी मी आता प्रयत्न करणार आहे. आमदार दिगंबर कामत यांचे हात बळकट करणार आहे. माझ्या सर्व मतदारांना मी वाकुन नमस्कार करते व कोणताही भेदभाव न ठेवता मी सर्वांसाठी कार्यरत राहणार आहे असे दिपाली सावळ यांनी सांगितले.
आपल्या प्रभागात कोरोना महामारीचा नायनाट करणे हे माझे पहिले उद्दीष्ट आहे. प्रभागात स्वच्छता राखणे यासाठी मी काम सुरू केले आहे असे दिपाली सावळ म्हणाल्या.
संपुर्ण गोव्यात सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम केलेल्या दिपाली सावळ यांचे मी अभिनंदन करतो. लोकांसाठी सदैव उपलब्ध राहणे व लोकांशी आपली नाळ जोडून ठेवणे हेच लोक प्रतिनिधीच्या यशासाठी महत्वाचे आहे असे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
मॉडेल मडगावने यंदाच्या निवडणूकीत आपली कामगीरी सुधारली अशून 6 वरुन आता त्यांचे 8 नगरसेवक निवडून आले आहेत.