आदिवासी जमीन मालकी हक्का संदर्भात कार्यक्रम
प्रतिनिधी / मडगाव
मडगाव रवींद भवनमध्ये शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी रोजी दु. 3 वा. ‘उटा’तर्फे आदिवासी जमीन मालकी हक्क संदर्भात जागृती कार्यक्रम व नवीन समिती स्थापन करण्याच्या सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आदिवासी कल्याणमंत्री गोविंद गावडे उपस्थित राहतील अशी माहिती ‘उटा’चे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी दिली.
मडगाव येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विश्वास गावडे, दुर्गादास गावडे, अनील गावकर, मोलू वेळीप, भालचंद्र उजगावकर व इतरांची उपस्थिती होती.
यावेळी कुमेरी, कुळ-मुंडकार, देवालय अशा विविध संदर्भाचे विषय पुढे घेऊन जाण्याचे काम ‘उटा’तर्फे केले जाईल. यासाठी नवीन समितीची स्थापना झाल्यानंतर प्रत्येकाला यासंदर्भात जबाबदाऱया दिल्या जाईल. अनुसूचित जमातीच्या हितासाठी चांगली कामगिरी केलेल्या दहा तालुक्यातील वयोवृद्धांचा यावेळी सत्कार करण्यात येईल असे अध्यक्ष वेळीप म्हणाले.
सत्तरी, डिचोली, फोंडा, तिसवाडी, मुरगांव, सासष्टी, सांगे, काणकोण व केपे तालुक्यात आदिवासी जमीन मालकी हक्क संदर्भात जागृती झालेली आहे. सरकारच्या मदतीने अनुसूचित जमातीच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ‘उटा’ ही संस्था प्रयत्न करेल. यासाठी अनुसूचित जमातीतील सरकारी कर्मचारी, महिला, युवकांचे सहकार्य घेतले जाईल. तसेच यावेळी सांगेचे उपजिल्हाधिकारी यांच्यातर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ते वन हक्क कायद्यासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन करतील. तेव्हा अनुसूचित जमातीतील लोकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकाश वेळीप यांनी केले आहे.