प्रतिनिधी /पणजी
वास्को तसेच मडगावहून येणाऱया गाडय़ा मेरशी जंक्शन येथे येऊन अटल सेतूवरून पुढे जातात, त्या अटल सेतूचा जोड रस्ता खचल्यामुळे तसेच हा मार्ग शंभर दिवस वाहतुकीस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांनी या निर्णयास अखेर परवानगी दिली. यानुसार आता हा भाग 26 नोव्हेंबरपर्यंत वाहतुकीस बंद राहील.
गोवा पायाभूत विकास महामंडळाने कंत्राटदार लार्सन ऍण्ड ट्रुब्रो कंपनीतर्फे उभारण्यात आलेल्या अटल सेतूचा हा भाग दुसऱयांदा खचला आहे. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार अटल सेतू संदर्भात कंत्राटदार कंपनीकडे पाच वर्षासाठीचा करार झालेला आहे. त्यानुसार पूल कार्यान्वित झाल्यापासून पाच वर्षापर्यंतच्या पुलाची देखभाल आणि दुरुस्तीचे कामही सदर कंत्राटदार कंपनी करणार आहे. त्यासाठी येणारा खर्च लार्सन ऍण्ड ट्रुब्रो कंपनी करणार आहे. अटल सेतूवर जाण्यासाठी मडगाव, वास्को वरून येणाऱया गाडय़ा या जोडरस्त्यावरून पुलावरुन जातात त्या ठिकाणीच म्हणजेच पुलाचा अखेरचा खांब आणि त्याला जोडणारा रस्ता या दरम्यानच पुलाचा खांब बराच खाली खचला गेल्यामुळे पुलाचा हा भाग वाहतुकीस बंद करावा लागणार याबाबतचे वृत्त दै. तरुण भारतमध्ये यापूर्वीच प्रसिद्ध झाले होते.
गोवा पायाभूत विकास महामंडळाने यापूर्वीच वाहतूक पोलीस विभाग आणि जिल्हाधिकाऱयांकडे या पुलाचा भाग वाहतुकीस बंद करण्याची मागणी केली होती. वाहतूक पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांनी ना हरकत दाखल दिला. त्यानुसार 11 ऑगस्टपासून हा भाग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. फोंडय़ाहून येणाऱया गाडय़ा मात्र मेरशीच्या जंक्शनवरून थेट अटल सेतूवरून जातील. मात्र मडगाव, वास्कोहून येणाऱया गाडय़ा मांडवी पुलावरून पर्वरीच्या दिशेने जातील.