समिती अध्यक्ष रवींद्र नाईक यांची टीका : शिमगोत्सवाचे यश काहींना खुपले, रोमटामेळ निकालात फेरफाराचा आरोप तथ्यहीन
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव शिमगोत्सव समितीने यंदा सर्वांना एकत्र घेऊन चांगले कार्यक्रम आयोजित करून शिमगोत्सव यशस्वीरीत्या साजरा केल्याने काहींच्या नजरेत ते खुपले आहे. त्यामुळे त्यांनी प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांतून समितीची बदनामी करण्याचे षड्यंत्र रचले असल्याची टीका मडगाव शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष नगरसेवक रवींद्र नाईक यांनी केली आहे.
यंदा शिमगोत्सव समितीचे सदस्य तसेच पालिकेचे नगरसेवक यांनी मिळून शिमगोत्सव कार्यक्रम व मिरवणूक असे तीन दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून शिमगोत्सव यशस्वी केल्याने मडगावात दोन शिमगोत्सव साजरे करणाऱयांच्या डोळय़ांत खुपले आहे. त्यांनी काही प्रसारमाध्यमांतून व समाजमाध्यमांतून टीका सुरू केली आहे. मात्र समाजमाध्यमांतून समितीचे आयोजनाबद्दल अभिनंदन करणारे अनेक संदेश आम्हाला पाहायला मिळालेले आहेत, असे नाईक यांनी सांगितले.
व्यवस्थित गुणांची जुळणी करून निकाल
रोमटामेळ गटाच्या निकालात फेरफार केल्याचा होणारा आरोप तथ्यहीन असून एकूण सहा परीक्षकांच्या गुणांची जुळणी करून निकाल जाहीर करण्यात आला आहे.. अनंत अग्नी, महेंद्र फळदेसाई व सुरेश नाईक या तीन परीक्षकांनी निकालात फेरफार झाल्याचे म्हटले असले, तरी दत्ता नाईक, सर्वेश नाईक व गुरुदत्त पालयेकर या अन्य तीन परिक्षकांनी रोमटामेळ स्पर्धेचे परीक्षण केले होते. त्यांचे गुण व वरील तीन परीक्षकांचे गुण जुळवून आम्ही बक्षिसे जाहीर केली असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.
निकालात फेरफार झाल्याची वावडी पसरल्याने मिरवणुकीत भाग घेतलेल्या काही रोमटामेळ पथकांनी आमच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून निकालाच्या फायली पडताळून पाहिल्या व त्यातून त्यांचे समाधान झाले असल्याचे नाईक यांनी नजरेस आणून दिले. आम्ही कोणत्याही परीक्षकाचा अपमान केलेला नसून त्यांचा आदरच करतो. जो निकाल जाहीर करण्यात आलेला आहे त्यात कोणताही पक्षपातीपणा नाही, असे नाईक यांनी स्पष्ट केले.
मडगाव शिमगोत्सवातील स्पर्धांचा सविस्तर निकाल
मडगाव शिमगोत्सवातील लोकनृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक सरस्वती कला मंडळ केळबाय, द्वितीय नवदुर्गा कला मंडळ मडकई, तृतीय यशशीला कल्वरल असोसिएशन, प्रियोळ तसेच पहिले उत्तेजनार्थ सावईवेरेंचो सख्याहरी, दुसरे श्री गुरू कला मंडळ, तर तिसरे विघ्नेश्वर कला मंडळ पाळोळे यांना प्राप्त झाले. रोमट?मेळ विभागात पहिले बक्षीस सावर्डे शिमगोत्सव मंडळ, दुसरे सुयोग शिमगोत्सव समिती आडपई, तिसरे कुडचडे काकोडा शिमगोत्सव समिती, चौथे श्री स्वरसाई शिमगोत्सव मंडळ म्हापसा, तर पाचवे पाईकदेव शिमगोत्सव समिती सांगे यांना प्राप्त झाले. या गटातील उत्तेजनार्थ बक्षिसे अनुक्रमे बार्देश शिमगोत्सव समिती, शांतादुर्गा शिमगोत्सव मंडळ, डोंगरी शिमगोत्सव समिती व श्री शांतादुर्गा लक्ष्मी शिमगोत्सव, सांकवाळ यांना मिळाली आहेत. चित्ररथ विभागात पहिले बक्षीस महालक्ष्मी नागरिक समिती बांदोडा, दुसरे साई बालमंडळ दुर्भाट-फोंडा, तिसरे श्री दामोदर महालक्ष्मी कलासंघ फोंडा यांना मिळाले असून पहिले उत्तेजनार्थ ब्रह्मेश्वर युवक संघ, दुसरे श्री गजानन कला मंडळ, तिसरे बालगोपाळ कला सांस्कृतिक मंडळ चिंबल, चौथे रायेश्वर युवक मंडळ राय, तर पाचवे सिद्धेश्वर कला मंडळ बस्तोडा यांना मिळाल्याचे शिमगोत्सव समितीने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.