17 रोजी दिंडी उत्सवाचा मुख्य दिवस
प्रतिनिधी / मडगाव
मडगाव येथील श्री हरि मंदिर देवस्थानतर्फे कार्तिकी एकादशीच्या वार्षिक 112व्या दिंडी महोत्सवाला काल गुरूवार पासून सुरवात झाली. विरोधी पक्षनेते तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत व प्रसिद्ध प्रवचनकार रमेश सप्रे यांच्या उपस्थित दीप प्रज्वलीत करून दिंडी उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या उत्सवाचा समारोप गुरुवार 18 नोव्हेंबर रोजी गोपाळकाला, महाआरती व तीर्थप्रसादाने होईल.
दिंडी उत्सव निमित्त देवस्थान समितीने विविध धार्मिक तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कोविड महामारी पूर्णपणे नियंत्रणात न आल्याने देवस्थान समितीने यंदा गायनी बैठक तसेच श्रींची पालखी मिरवणूक रद्द केली आहे. पालखी उत्सव मंदिराच्या आवारात साजरा केला जाणार आहे.
काल गुरूवारी सकाळी 8 वाजता श्रीची विविवत श्रींची षोडपचार महापूजा व इतर धार्मिक विधी करण्यात आले. संध्याकाळी उद्घाटन समारंभा नंतर रमेश सप्रे गुरुजी यांचा प्रवचनाचा कार्यक्रम झाला.
उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार दिगंबर कामत म्हणाले की, कोविड महामारी अजून पुर्णपणे संपुष्टात आलेली नाही. त्यामुळे यंदाही दिंडी उत्सव सोहळा साधेपणानेच साजरा करण्याचा देवस्थान समितीचा निर्णय स्तुत्य असाच व लोकांच्या हिताचा आहे. या वेळी त्यानी आपल्या लहानपणीच्यां दिंडी उत्सवाची माहिती दिली. कीर्तन व प्रवचनातुन चांगले संस्कार घडतात असेही ते म्हणाले.
श्री हरि मंदिर देवस्थानचे अध्यक्ष सुहास कामत यानी सर्वांचे आभार व्यक्त केले व पुढील सात दिवस दिंडी उत्सवाला भाविकांनी उपस्थिती लावावी असे आवाहन केले.
रमेश सप्रे यांचे प्रवचन 12 व 13 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. त्यानंतर 14, 15 व 16 असे सलग तीन दिवस संध्याकाळी 7 वाजल्या पासून वाळपई येथील ह. भ. प. विवेकबुवा जोशी यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार 17 नोव्हेंबर या कार्यक्रमाच्या मुख्य दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून धार्मिक विधींना सुरवात होईल.
बुधवार 17 नोव्हेंबर या कार्यक्रमाच्या मुख्य दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून धार्मिक विधी त्यानंतर 10 वाजल्यापासून सुरेंद्र बोरकर व साथी यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी 6.30 वा. श्री विठ्ठल रखुमाईची धार्मिक ग्रंथासह मंदिरा भोवती प्रदक्षिणा व 7 वाजल्यापासुन भक्तीरंग, मडगाव तर्फे भक्तीगीतांचा कार्यक्रम होणार आहे.