प्रतिनिधी /मडगाव
सतत दोन वर्षे कोविड महामारीने संपूर्ण देशात थैमान घातल्यानंतर आता कुठे चांगले दिवस दिसायला लागलेत. गोमंतकातील मंदिरातील धार्मिक तथा सांस्कृतिक कार्यक्रम अनेक निर्बंधामुळे बंदच पडले होते. मडगावातील श्री हरि मंदिर देवस्थान सुध्दा त्याला अपवाद नव्हतं. या संदर्भात रविवार दि. 6 मार्च रोजी देवस्थान विश्वस्त मंडळाची बैठक होऊन श्री हरि मंदिरात पूर्वी प्रमाणेच कार्यक्रम सुरु करण्याचे एकमताने ठरविण्यात आले.
तसेच देवस्थानचे आजीव सभासद, हितचिंतक तथा इच्छूक भक्तांना मंदिरात आपल्या वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा इतर कोणत्याही शुभ दिनी एक दिवसीय नित्य सेवा उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले. त्याच बरोबर भक्तांना सोईस्कर व्हावे म्हणून मंदिरात इतर लहान मोठी धार्मिक अनुष्ठान करण्यासाठी देवस्थानतर्फे ब्राह्मण व इतर तयारी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुकांनी विश्वस्त मंडळाकडे संपर्क करण्याची विनंती केली आहे.
शनिवार व रविवारी सांस्कृतिक कार्यक्रम
दरम्यान, श्री हरि मंदिरात शनिवार, दि. 12 मार्च आणि रविवार, दि. 13 मार्च 2022 रोजी सतत दोन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 12 रोजी सद्गुरू सत् शिष्या सौ. निवेदिता धावडे, मुंबई यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम ः विषय-‘कर्माचं फळ कर्मातच’. वेळ सायंकाळी 6 वा. रविवार दि. 13 मार्च रोजी ‘महिला दिना’ प्रित्यर्थ भारतीय स्त्री शक्ती, गोवा या संस्थे तर्फे मंदिराच्या प्रांगणात ‘विविध सांस्कृतिक / ललित कार्यक्रमाचे’ आयोजन होणार आहे. वेळ संध्याकाळी 3 वा. हे दोन्ही कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहेत याची नोंद घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.