छ. शिवाजी महाराज, महर्षि वाल्मिकी यांचा पुतळा उभारणार
प्रतिनिधी/ संकेश्वर
मणगुत्ती (ता. हुक्केरी) येथे नियोजित छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचे काम वादाच्या भोवऱयात सापडले होते. या वादावर तोडगा काढून गावकऱयांच्या मागणीखातर एकाच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व महर्षि वाल्मिकी यांचे पुतळे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गुरुवार दि. 8 रोजी बसस्थानकानजीकच्या नियोजित ठिकाणी पुतळय़ासाठी चबुतरा बांधकामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या समारंभाला आमदार सतीश जारकीहोळी उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चबुतऱयावरुन उतरवल्याप्रकरणी मोठा वाद निर्माण झाला होता. या वादाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले होते. तथापि सोमवारी नाशिकहून शिवसैनिकांनी मणगुत्ती गावाला छत्रपती शिवाजी महाराजांची 4 फूट उंचीची मूर्ती भेट देऊन शिवरायांचा आदर बाळगा, असे सूचित केले आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी आमदार सतीश जारकीहोळी यांनी मणगुत्ती गावाला भेट दिली. बसस्थानकाच्या जागेसंदर्भात असणारा वाद मिटवला व पुन्हा बसस्थानकाचे शेड काढण्याच्या कामाला गती आणली आहे.
गुरुवारी 8 रोजी आमदार सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत दोन्ही पुतळय़ांसाठी चबुतरा निर्माण करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. चबुतऱयाचे काम पूर्ण होताच शुभमुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराज व महर्षि वाल्मिकी महाराजांचे पुतळे उभारण्यात येणार आहेत. सध्या मणगुत्ती गावात कोणताही वाद होऊ नये यासाठी गावात राखीव पोलीस दलाच्या दोन तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.