शिवाजी महाराज मूर्तीच्या अवमान प्रकरणाचा खटला
प्रतिनिधी /बेळगाव
मणगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीची प्रतिष्ठापना करताना वाद्ग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर करणारे महाराष्ट्रातील दिनेश कदम यांच्यावर यमकनमर्डी पोलिसांनी 10 ऑगस्ट 2020 रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे दिनेश कदम यांनी न्यायालयात हजर होऊन जामीन घेतला आहे.
यमकनमर्डी पोलिसांनी दिनेश कदम यांच्यावर भा.दं.वि. 505(2) अन्वये गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने समन्स बजावल्यानंतर संकेश्वर येथील अतिरिक्त कनिष्ठ दिवाणी न्यायालय, प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर होऊन त्यांनी जामीन घेतला. यावेळी 25 हजार रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र, तितक्याच रकमेचा एक जामीनदार, प्रत्येक तारखेला हजर राहणे, साक्षीदारांना धमकावू नये, या अटींवर जामीन मंजूर करण्यात आला. त्यांच्यावतीने अॅड. महेश बिर्जे हे काम पाहत आहेत. यावेळी बेळगाव येथील नगरसेवक शिवाजी मंडोळकर, युवा म. ए. समितीचे अध्यक्ष शुभम शेळके आदी उपस्थित होते.