उत्तराखंड, गोव्यासंबंधी निर्णय आज भाजपमध्ये जोरदार राजकीय हालचाली
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकदा एन. बिरेन सिंग हेच विराजमान होतील, हे आता निश्चित झाले आहे. रविवारी या राज्याची राजधानी इंफाळ येथे भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांची नेते म्हणून निवड करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन निरीक्षक म्हणून उपस्थित होत्या. बिरेन सिंग यांची निवड एकमताने करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या राज्यात भाजपला 60 पैकी 32 जागा मिळाल्याने स्वबळावर पूर्ण बहुमत मिळाले आहे. भाजपला या राज्यात पूर्ण बहुमत मिळण्याची ही प्रथम वेळ आहे. बिरेन सिंग राज्याला विकासाभिमुख सरकार देतील, असा विश्वास सीतारामन यांनी व्यक्त केला.
उत्तराखंडात आमदारांचा शपथविधी आज
विधानसभा निवडणुकीत उत्तराखंडातही भाजपचा मोठा विजय झाला असून 70 पैकी 47 जागा या पक्षाने मिळविल्या आहेत.
आज सोमवारी राजधानी डेहराडून येथे विधानसभेचे अधिवेशन होणार असून सर्व आमदारांचा शपथविधी होणार आहे. भाजपने अद्याप मुख्यमंत्रिपदी नेत्याची निवड केलेली नाही. आमदारांचा शपथविधी झाल्यानंतर भाजपच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून त्यात नेतानिवड होणार आहे.
मुख्यमंत्र्यांचा शपथविधी येत्या एक दोन दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पक्षसूत्रांकडून देण्यात आली.
गोव्याचाही मुख्यमंत्री आज ठरणार
गोव्याच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी झाला असून मुख्यमंत्र्यांची निवड आज सोमवारी होण्याची शक्यता आहे. या राज्यात सलग तिसऱयांदा भाजपचे सरकार स्थापन होणार असून हा भाजपच्या दृष्टीने गोव्यातील एक विक्रमच आहे. विधीमंडळ पक्ष बैठकीत रीतसर नेतानिवड होणार असून प्रमोद सावंत यांच्यावरच या पदाची धुरा पुन्हा सोपविली जाण्याची शक्यता आहे. या राज्यात भाजपला 40 पैकी निम्म्या म्हणजे 20 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी एक जागा कमी असली तरी निम्म्या जागा मिळाल्याने भाजपशिवाय कोणी सरकार स्थापन करु शकत नाही. भाजपला मगो पक्षाच्या 2 आणि 3 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिल्याने सरकारच्या बाजूच्या आमदारांची संख्या 25 आहे.
पंतप्रधान मोदींच्या बैठका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी रविवारी प्रदीर्घ बैठक झाली. या बैठकीत भाजप अध्यक्ष नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदी नेते उपस्थित होते. उत्तराखंड आणि गोवा राज्यांचे मुख्यमंत्री ठरविण्यासंदर्भात बराच काळ चर्चा झाली. मात्र, निर्णयासंबंधी माहिती देण्यात आली नाही. आज सोमवारीच त्या त्या राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे.
उत्तर प्रदेशमधील हालचाली
भाजपला बहुमत मिळाल्यास उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असे आधीच घोषित करण्यात आले होते. त्यांची येत्या एक दोन दिवसात रीतसर त्या पदावर निवड करण्यात येईल. त्यांच्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश असणार या संदर्भात दिल्लीत आणि लखनौमध्ये अनेक बैठका झाल्या आहेत. तसेच उपमुख्यमंत्रीपदी किती आणि कोण असतील हे निश्चित करण्यासाठीही जोरदार हालचाली सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत पराभव झालेले माजी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का या प्रश्नाचे उत्तरही येत्या काही दिवसांमध्ये मिळणार आहे. उत्तर प्रदेशात मंत्रीमंडळाच्या सदस्यांची निवड करताना जात, विभाग आणि स्त्री-पुरुष आदी समतोल राखण्याची योजना असून त्यादिशेने दिल्लीतही हालचाली होत आहेत. स्वतंत्रदेव सिंग, ब्रजेश पाठक, श्रीकांत शर्मा, कुंवर ब्रिजेश सिंग, अदिती सिंग, असीम अरुण आदींचा समावेश केला जाण्याची चर्चा आहे. तर संभाव्य उपमुख्यमंत्र्यांमध्ये ब्रजेश पाठक, श्रीकांत शर्मा, बेबी रानी मौर्य, दिनेश शर्मा आणि केशव प्रसाद मौर्य यांच्या नावांची चर्चा आहे. एका दलित मंत्र्यांनाही उपमुख्यमंत्रीपद द्यावे, असा विचार पक्षाच्या वर्तुळात होत आहे. आज सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लखनौला जात आहेत. त्यांच्या उपस्थितीत सर्व मुद्दय़ांवर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.