ऑनलाईन टीम / इंफाल :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यात पुन्हा एकदा लॉक डाऊन जारी करण्यात येत आहे. त्यातच आता मणिपूर सरकारने पुन्हा एकदा संपूर्ण लॉक डाऊनचा निर्णय घेतला.
या निर्णयानुसार, आज म्हणजेच गुरुवारी दुपारी दोन वाजल्यापासून पुढील 14 दिवसांसाठी हे लॉक डाऊन असणार आहे. याआधी देखील राज्यातील थौबुल जिल्ह्यात 27 जुलैपर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात आले आहे. लॉक डाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. लॉक डाऊनमध्ये जिल्ह्यांमधील अंतर्गत रस्त्यांवर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
या लॉक डाऊनमध्ये रुग्णालये, मेडिकल दुकाने यासोबतच अत्यावश्यक सेवा सुरू असतील. तसेच सर्व प्रकारचे बाजार आणि सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहेत. सरकारी आणि खासगी कार्यालये देखील बंद असतील.
दरम्यान, सध्या मणिपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार पेक्षा अधिक आहे. यातील 1400 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. अनेक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 100 टक्के आहे. तर राज्यात आतापर्यंत एकही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. तरी देखील कोरोनाची साखळी पहिल्यापासूनच तोडण्यासाठी पुन्हा एकदा लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे.