38 मतदारसंघांमध्ये 173 उमेदवार रिंगणात
इंफाळ / वृत्तसंस्था
मणिपूरमध्ये सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने 38 मतदारसंघांमध्ये मतदानाची तयारी पूर्ण केली आहे. या पहिल्या टप्प्यात 173 उमेदवार रिंगणात असून त्यात केवळ 15 महिला उमेदवार असल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना आपला हक्क बजावता येणार आहे. दुसऱया टप्प्यात 5 मार्च रोजी राज्यातील उर्वरित 22 जागांसाठी मतदान होणार आहे. दोन्ही टप्प्यातील निकाल 10 मार्च रोजी जाहीर केला जाणार आहे.
मणिपूरमधील मतदानाच्या तारखांमध्ये निवडणूक आयोगाने बदल केला होता. सुरुवातीला पहिला टप्पा 27 फेब्रुवारीला आणि दुसरा टप्पा 3 मार्चला घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, काही दिवसांनंतर सुरक्षा आणि अन्य समस्यांमुळे तारखेत बदल करत अनुक्रमे 28 फेबुवारी आणि 5 मार्च अशाप्रकारे बदल करण्यात आला. त्यानुसार निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केली आहे. पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱया 38 जागा हय़ा पाच जिल्हय़ांमध्ये व्यापलेल्या आहेत. 38 पैकी 29 मतदारसंघ इंफाळ इस्ट, इंफाळ वेस्ट आणि विष्णूपूर जिल्हय़ांमध्ये आहेत. तर उर्वरित 9 मतदारसंघ चुरचंदपूर, कांगपोक्पी आणि फेर्झवल जिल्हय़ांमध्ये आहेत.
निवडणुकीपूर्वी हिंसाचार, स्फोटात दोघांचा मृत्यू
राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वीच येथे हिंसाचार सुरू असून शनिवारी रात्री चुरचंदपूरमध्ये स्फोट घडवण्यात आला. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला असून अन्य पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर इस्पितळात उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. प्राथमिक तपासाअंती या स्फोटामागे उग्रवादी संघटनांचा हात नसल्याचा दावा करण्यात आला आहे. याचा निवडणुकीशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.