अज्ञातांनी झाडल्या गोळय़ा : मतदानाच्या एक दिवसापूर्वी घटना
मणिपूरच्या क्षत्रियगाव येथील संजद उमेदवारावर अज्ञातांनी गोळय़ा झाडल्या आहेत. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली आहे. जखमी रोजितकुमार (47 वर्षे) यांच्यावर मेडिसिटीमध्ये उपचार सुरू आहेत. राज्यात पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत 28 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये विधानसभेच्या 60 जागांसाठी पूर्वी 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च रोजी मतदान होणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. परंतु निवडणूक आयोगाने यात बदल करत 28 फेब्रुवारी आणि 5 मार्च हे दिवस मतदानासाठी निश्चित केले आहेत.
पहिल्या टप्प्याच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भीषण बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात एकाचा मृत्यू आणि 5 जण जखमी झाले होते. बॉम्बस्फोटाची ही घटना चूडाचांदपूर जिल्हय़ातील गँगपीमोलमध्ये घडली होती.