क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
एफसी गोवाने फ्री ट्रान्सफरवर विंगरच्या स्थानावर खेळणाऱया नोंगडोंबा नावोरॅम या 21 वर्षीय मणिपूरी फुटबॉलपटूला करारबद्द केले आहे. देशातील एका मोठय़ा क्लबशी मी करार केल्याने आनंदित झालो आहे, असे करार झाल्यानंतर नोंगडोंबा म्हणाला. माझे स्वप्न साकार झाले असून माझ्या फुटबॉल जीवनातील नवीन अध्याय सुरू झाल्याचे तो म्हणाला.
तांत्रिकदृष्टय़ा सक्षम असलेला नोंगडोंबा नावोरॅम हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्यांच्या समावेशाने एफसी गोवाच्या संघात अधिक बळकटी येईल, असे एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुष्कर म्हणाले. 2019-20 मोसमातील आय-लीग फुटबॉल स्पर्धेत मोहन बागानला खेळताना आमचे त्याच्यावर लक्ष होते. मात्र पूर्ण तंदुरूस्त नसल्याने गेल्या वर्षी आम्ही त्याला करारबद्ध केले नाही. नोंगडोंबा नावोरॅम हा आमच्या सिस्टिममध्ये बसणार फुटबॉलपटू आहे, असे पुष्कर म्हणाले.
नोंगडोंबा केरळ ब्लास्टर्सला दोन सीझन खेळल्यानंतर एफसी गोव्याला आला आहे. या दोन सीझनमधील एक मोसम तो ऑन-लोनवर मोहन बागानला होता. 2020 मध्ये बागानला आय-लीगचे जेतेपद मिळवून देताना त्याने 16 सामन्यांत पाच वेळा असिस्ट करताना दोन गोलही केले होते. गेल्या आयएसएल फुटबॉल स्पर्धेत तो केरळ ब्लास्टर्ससाठी केवळ तीन सामने खेळला व नंतर त्याला इंज्युरीमुळे बाहेर बसावे लागले.
मणिपूरमधील वाबागई येथील नोंगडोंबा प्रथम मिनर्व्हा पंजाबसाठी खेळला. 2017 मध्ये झालेल्या फिफा विश्वचषक 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघात खेळताना त्याने आपले लक्ष वेधून घेतले होते. केरळात खेळण्यापूर्वी तो आय-लीग फुटबॉल स्पर्धेत इंडियन ऍरोजसाठी खेळला. शिलाँग लाजाँगविरूद्धच्या सामन्यात त्याने सोलो अफॉर्टवर पाच प्रतिस्पर्धी खेळाडूंना आणि नंतर गोलरक्षकाला चकवित केलेला गोल अजूनही लोकांच्या आठवणीत आहे.