मणेराजूरी / वार्ताहर
मणेराजूरीत ज्यु. कॉलेजच्या युवकांच्या वादातून एका विद्यार्थ्यांस चाकूने पोटात भोसकले. यात अक्षय बाबासो चव्हाण (वय 18 ) हा गंभीर जखमी झाला असून त्यास सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजता हायस्कुल शाळेच्या बाजूस असणाऱ्या रस्त्यावर घडली. या घटनेची तासगांव पोलीसात नोंद झाली आहे ; या प्रकरणी तीन अल्पवयीन विदयार्थ्यांचा सहभाग असल्याचा पोलीसांचा कयास आहे.
याबाबत घटनास्थळ व तासगांव पोलीसांच्याकडून समजलेली माहिती अशी की जखमी अक्षय चव्हाण व इतर हल्ला करणारे आरोपीच्या मध्ये काही महिन्यांपूर्वी पासून वाद होत होता त्यातूनच हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे ; शुक्रवारी सकाळी हायस्कूलच्या बाजूस असणाऱ्या अरुंद रस्त्यावर या विदयार्थ्यांच्यामध्ये वाद सुरु झाला. यातूनच एकाने अक्षय याच्या पोटावर धारदार चाकूने जोराचा वार केला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली यात अक्षय जखमी झाल्याने तातडीने त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करणेत आले ; वाद करणारे सर्वजण इयत्ता बारावीत शिकत असलेचे समजते ; या घटनेची वर्दी पोलीस पाटील दिपक तेली यांनी तासगांव पोलीसात दिली ;तर घटनास्थळी असलेला धारदार चाकू पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.
या घटनेचे गांभीर्य ओळखून तासगांव पोलीसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला ;यावेळी पोलिस अधिकारी नितीन कोराम ;व्ही .एस. मोहीते ;हणमंत गवळी ;हवालदार माने आदी पोलीस उपस्थित होते. अधिक तपास मदने करीत आहेत.