हभप शिवलिलाताई पाटील यांचे कीर्तन लक्षवेधी : शिवप्रेमींची गर्दी
वार्ताहर /हिंडलगा
मण्णूर येथील हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर बाळेकुंद्री उपस्थित होते.
येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देवस्की पंच कमिटी अध्यक्ष मुकुंद तरळे, ता. पं. माजी सदस्य एस. एल. चौगुले, म. ए. समिती युवा नेते व अभियंते आर. एल. चौगुले, भाजप ग्रामीण माजी अध्यक्ष विनय कदम, उचगाव ब्लॉक काँग्रेसचे जयवंत बाळेकुंद्री, रेखा चौगुले, अभियंते अरुण कदम, ग्रा. पं. सदस्य, सदस्या उपस्थित होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते संघटनेतर्फे आयोजित किल्ला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केलेल्या कार्यकर्त्यांना सर्टिफिकेटचे वितरण करण्यात आले. तत्पूर्वी संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तींचे पूजन करून पाळणागीत म्हणण्यात आले. यावेळी गावातील महिलांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला. गावातील युवकांना समाजसेवेसाठी प्रोत्साहन मिळावे, युवापिढी सदृढ व निर्व्यसनी बनावी यासाठी संघटनेतर्फे प्रतिवर्षी विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानुसार यावर्षी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हभप शिवलिलाताई पाटील यांचे ‘छत्रपती शासन’ या विषयावर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मण्णूरसह शहर आणि परिसरातील सुमारे दहा हजारहून अधिक शिवप्रेमी व महिलांनी उत्स्फूर्तपणे गर्दी केली होती. भजनी मंडळांच्या टाळ-मृदंगाच्या तालावर आपल्या भारदस्त शैलीत हभप शिवलिलाताई पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा दाखला दिला. तसेच युवापिढीला व्यसनांच्या आहारी न जाता छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून कार्यरत राहण्याचे आवाहन केले. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मशाल, फटाक्यांची आतषबाजी व शिवरायांच्या जय जयकाराने त्यांचे जल्लोषी स्वागत केले. दरम्यान, संघटनेतर्फे गावामध्ये पंचधातूचा भव्य असा अश्वारुढ शिवपुतळा प्रतिष्ठापित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी ग्रा. पं. सदस्य, देवस्की पंच कमिटी, सांप्रदायिक भजनी मंडळ, महिला मंडळ व देणगीदार उपस्थित होते. सुजीत मंडोळकर व डॉ. भरत चौगुले यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.