बेळगाव / प्रतिनिधी
महापालिकेच्या 58 वॉर्डांकरीता निवडणूक होत असून शुक्रवार दि. 3 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सरकारी कार्यालये, शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले आहे.
महापालिका निवडणुकीची घोषणा 11 ऑगस्ट रोजी झाली होती. शुक्रवार दि. 3 रोज सकाळी 7 पासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया होणार आहे. मतदानाचा हक्क सर्वांनी बजावावा यादृष्टीने अनुदानित शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच शासनाच्या कायद्यानुसार सर्व क्षेत्रातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. त्यामुळे खासगी संस्था, उद्योगधंदे, आणि खासगी कंपन्यांना देखील सुटी जाहीर करण्यात आली आहे. वेतनसहित रजा देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र तात्काल सेवेसाठी असलेल्या सरकारी नोकरांनी मतदान करून पुन्हा कामावर हजर रहावे, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली आहे.