पंजाबमध्ये मतदान होण्यापूर्वी दोन दिवस आधी पंतप्रधान मोदी यांनी मान्यवर शीख व्यक्तींची भेट घेऊन त्यांच्याशी विचारविमर्ष केला आहे. त्यात दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे प्रमुख हरमितसिंग कालका, यमुनानगर येथील महंत कर्मजितसिंग, पंजाबचे संत बलबीरसिंग सिचेवाल इत्यादी महनीयांचा समावेश आहे.
या सर्व व्यक्ती आणि त्यांच्या संस्था शीख समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करीत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी शीख समुदायासाठी आजवर केलेल्या कार्याचा या महनीयांनी गौरव केला असून त्यांना आशीर्वाद दिले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी शीखविरोधी दंगलीतील आरोपींना शिक्षा मिळवून देण्यासाठी विशेष तपास दलाची नियुक्ती केली होती. याबद्दल हरमितसिंग कालका समाधान व्यक्त केले. तसेच शीखांचे गुरु नानकदेव यांच्या कर्तारपूर येथील पवित्रस्थळी जाण्यासाठी कॉरिडॉर उघडून दिला. याबद्दलही त्यांनी कौतुक केले आहे.
शीख समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी सरकार शक्मय ते सर्व प्रयत्न करीत आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी या चर्चेत शीख मान्यवरांना दिली. पंजाबमध्ये शांतता नांदावी, देशविरोधी शक्तींचा बंदोबस्त व्हावा, राज्यात उद्योग आणि व्यवसायांची वाढ व्हावी, बेरोजगारीच्या प्रश्नावर तोडगा काढावा आणि महिलांची सुरक्षा आणि शिक्षण सुनिश्चित व्हावे, अशी शीख मान्यवरांची इच्छा असून केंद्र सरकार त्यादृष्टीने प्रयत्नशील आहे. यासंबंधी काही धोरणे आखण्यात आली असून त्यांचे परिणाम येत्या काही दिवसात दिसून येतील, अशी माहिती शीख मान्यवरांना देण्यात आली. केंद्र सरकारने वीरबाल दिवस साजरा करण्याची केलेली घोषणा प्रशंसनीय आहे, असे महंत कर्मजितसिंग यांनी स्पष्ट केले. गुरुद्वारामध्ये होणाऱया लंगरवरील जीएसटी रद्द करण्यात आला. याबद्दलही समाधान व्यक्त करण्यात आले. डेराबाबा नानकसरचे प्रमुख बाबा जोगासिंग, अमृतसरच्या डेराबाबा तारासिंहवालाचे प्रमुख मुखीसंत बाबा मेजरसिंगवाला, आनंदपूरसाहिब कारसेवा जथ्थेदार बाबासाहिबसिंग, नामधारी दरबार भैणीसाहिबचे प्रमुख सुरिंदरसिंग, शिरोमणी अकाली बुढ्ढादलचे प्रमुख बाबा जस्सासिंग, दमदमी टाकसाळ चौक मेहताचे प्रमुख डॉ. हरभजनसिंग आणि तख्त श्री पटणासाहिबचे जथ्थेदार ग्यानी रणजितसिंग हे देखील पंतप्रधान मोदींबरोबर झालेल्या बैठकीत होते.