सर्व 70 मतदारसंघांमध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत कालावधी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज शनिवारी मतदान होत आहे. मुख्य स्पर्धा सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात आहे. काँगेसही मैदानात आहे. मतदान सुरळीत पार पडावे म्हणून सर्व 70 मतदारसंघांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा सैनिक नियुक्त केले जातील, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
2015 मध्ये झालेल्या मागच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने भाजपसह इतर सर्व पक्षांचा धुव्वा उडवत प्रचंड विजय मिळविला होता. या पक्षाने 52 टक्के मतांसह 70 पैकी तब्बल 67 जागा मिळवत विक्रम केला होता. यावेळी अशाच विक्रमाची पुनरावृत्ती हा पक्ष करू शकेल का, याकडे औत्सुक्याने पाहिले जात आहे. मात्र, दुसऱया बाजूला भाजपनेही जोरदार सज्जता केली असून आम आदमी पक्षासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.
विविध मुद्दे उपस्थित
आम आदमी पक्ष त्याच्या गेल्या पाच वर्षांमधील कामगिरीच्या आधारावर ही निवडणूक लढविण्याचा दावा करीत आहे. .तर भाजपने 3 महानगरपालिकांमधील आपल्या कामगिरीचा मुद्दा प्रामुख्याने मांडला आहे. दिल्लीच्या तीनही महानगरपालिकांमध्ये भाजपचे बहुमत आहे. वीज, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा, सुरक्षा, नागरी वाहतूक आणि शिक्षण अशा विविध मुद्दय़ांवर ही निवडणूक लढली जात आहे. याशिवाय नागरीकत्व सुधारणा कायदा आणि त्याविरोधात शाहीनबाग येथे चाललेले आंदोलन या मुद्दय़ाभोवतीही अखेरच्या टप्प्यात मोठय़ा प्रमाणात प्रचार फिरला होता. आम आदमी पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री केजरीवाल व शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन इत्यादी नेत्यांनी प्रचाराचे रान उठविले होते. निवडणूक चुरशीची होईल असे अनुमान आहे.
राष्ट्रीयत्व आणि स्थानिक मुद्दे
भाजपच्या प्रचारात स्थानिक मुद्दय़ांप्रमाणेच राष्ट्रवाद, राष्ट्रीय नागरीक सूची, राष्ट्रीय लोकसंख्या नोंद योजना इत्यादी मुद्दय़ांवरही भर देण्यात आला होता. आम आदमी पक्ष देशाचे तुकडे करू इच्छिणाऱयांच्या सोबत आहे, असा आरोप भाजपने केला होता. आक्षेपार्ह विधाने करण्यासाठी दोन भाजप नेत्यांवर निवडणूक आयोगाने काही दिवसांसाठी प्रचारबंदीही घातली होती.
मंगळवारी मतगणना
येत्या मंगळवारी सर्व 70 मतदारसंघांमध्ये मतगणना करण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत घेण्यात आलेल्या मतदानपूर्व सर्वेक्षणांमध्ये आम आदमी पक्ष आघाडीवर असल्याचे दिसत आहे. मात्र प्रत्यक्ष परिणाम समोर आल्यानंतरच सत्यस्थिती स्पष्ट होणार आहे. परिणामांचे सर्वसाधारण अनुमान मतदान झाल्यानंतर प्रसिद्ध होणाऱया मतदानोत्तर चाचण्यांमधून येऊ शकणार आहे, असेही तज्ञांचे मत आहे.
दिल्ली निवडणूक आकडय़ांमध्ये…
एकंदर जागा 70
एकंदर उमेदवार 672
पुरूष मतदार 81 लाख 5 हजार 236
महिला मतदार 66 लाख 80 हजार 277
सेवारत मतदार 11 हजार 608
तृतियपंथी मतदार 869
सुरक्षा सैनिक तुकडय़ा 190
मतदानकेंद्रे 13 हजार 750
संवेदनशील मतदारसंघ 3 हजार 704
2015 चे पक्षीय बलाबल
एकंदर जागा 70
आम आदभी पक्ष 67
भारतीय जनता पक्ष 3
काँगेस 0
अपक्ष व इतर 0