काकती येथील मतदारांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
वॉर्ड क्रमांक 55 मध्ये 1200 मतदार आहेत. त्यामध्ये काकतीमधील एक हजार मतदार आहेत. असे असताना महापालिका निवडणुकीसाठी मागीलवेळी मुत्यानट्टीमध्ये मतदान केंद्र करण्यात आले होते. यावेळीही हाच प्रकार घडला आहे. तेव्हा काकतीमध्येच मतदान केंद्र करावे, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा काकती येथील मतदारांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केला आहे.
काकती सिद्धेश्वरनगरमधील सेंट जॉन्स हायस्कूलमध्ये मतदान केंद्र करावे, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले. मतदानासाठी काकती येथून मुत्यानट्टीला मतदारांना जावे लागत आहे. वृद्ध तसेच महिलांना त्याठिकाणी जाणे कठीण आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
काकती येथे निदर्शने करून निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या नावे हे निवेदन देण्यात आले. याचबरोबर महापालिकेच्या अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी श्रीकांत टुमरी, अनिल देशपांडे, राजू नार्वेकर, एकनाथ यतोजी, प्रशांत मरगी, शीतल टुमरी, सुष्मिता देशपांडे, वाणी नाईक यांच्यासह नागरिक उपस्थित होते.