अधिकारी निलंबित, नव्या यंत्रांवर झाली निवडणूक
कोलकाता / वृत्तसंस्था
भाजप नेत्याच्या पत्नीच्या कारमध्ये एक मतदान यंत्र सापडल्याची आसाममधली घटना ताजी असतानाच, पश्चिम बंगालमध्ये चार मतदान यंत्रे आणि पाच व्हीव्हीपॅट यंत्रे, तृणमूल काँगेसच्या नेत्याच्या घरातून ताब्यात घेण्याची घटना घडली आहे. ही यंत्रे ज्या निवडणूक अधिकाऱयाच्या ताब्यात होती, तो या यंत्रांसह या नेत्याच्या घरी रात्रभर झोपल्याचे समजल्यानंतर निवडणूक आयोगाने यंत्रे ताब्यात घेतली. या अधिकाऱयाला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.
राज्यात तिसऱया टप्प्याच्या मतदानासाठी या यंत्रांचा उपयोग होणार होता. मतदानाच्या आदल्या रात्री तपन सरकार या नावाचा निवडणूक अधिकारी या मतदान यंत्रांसह गौतम घोष नामक तृणमूल नेत्याच्या घरी आला. त्याने रात्रभर तेथे झोप घेतली. पहाटे मतदान सुरू होण्यापूर्वी काही तास ही बाब निवडणूक आयोगाच्या लक्षात आली. त्वरित सरकार याच्या विरोधात कारवाई करण्यात आली. तसेही त्याच्या जवळ असणारी यंत्रे निकामी ठरविण्यात आली. निवडणुकीसाठी नवी यंत्रे उपलब्ध करण्यात आली. हा प्रकार हावडा जिल्हय़ातील उलुबेरिया मतदारसंघातील एका मतदान केंद्राच्या संदर्भात घडला आहे.
नेमके काय घडले ? उपलब्ध माहितीनुसार सुदीप चक्रवर्ती नामक अधिकाऱयाने ही यंत्रे सरकार याच्या हाती सोपविली होती. ही यंत्रे मुख्य नसून ती अतिरिक्त यंत्रे होती. ही यंत्रे सिकदर याच्याकडे का सोपविण्यात आली, याची चौकशी करण्यात येत आहे. ही यंत्रे घेऊन तो घोष याच्या घरी जाऊन तेथे त्याने रात्र घालविली. सुदीप चक्रवर्ती या अधिकाऱयालाही निलंबित करण्यात आले आहे. आपण केवळ विश्रांतीसाठी घोष याच्या घरी गेलो होतो. यंत्रे बाहेर ठेवणे धोक्याचे होते म्हणून ती घेऊन आपण घरात गेले, अशी सारवासारवी सरकार याने केली आहे. दोन्ही निवडणूक अधिकाऱयांवर कठोर कारवाई केली जाणार असून त्यांना जबर शिक्षा होण्याची शक्यता आहे. मतदान यंत्रे घरात नेणे हा गंभीर गुन्हा असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. याप्रकरणी कारावासाची शिक्षाही होण्याची शक्यता आहे