वॉर्ड. क्र. 49 मधील सफार गल्ली-वझे गल्लीतील मतदारांचा समावेश 40 क्रमांकच्या वॉर्डमध्ये असल्याने गोंधळ
बेळगाव / प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी जोरदार प्रचार चालविला आहे. मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतांची याचना उमेदवार करीत आहेत. वॉर्ड क्र. 49 मधील उमेदवारांनी सफार गल्लीसह परिसरातील मतदारांच्या भेटी घेऊन मतदान करण्याची विनंती केली. मात्र सफार गल्ली आणि वझे गल्लीचा भाग वॉर्ड. क्र. 49 मध्ये येत नसल्याचे सांगून सदर भागातील मतदारांचा समावेश 40 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये करण्यात आल्याने उमेदवारांना धक्का बसला आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड पुनर्रचना करण्यात आली. तसेच घिसाडघाईने मतदारयाद्या तयार करून निवडणुकीची घोषणा करण्यात आली. मात्र निवडणुकीच्या तोंडावर मतदारांचा समावेश एका वॉर्डातून दुसऱया वॉर्डात करण्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून प्रचार करणाऱया उमेदवारांना याचा फटका बसला आहे. वॉर्ड पुनर्रचना व्यवस्थित झाली नसल्याची तक्रार सातत्याने होत आहे. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तरीदेखील राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. 2018 मध्ये वॉर्ड पुनर्रचना करून मतदारयाद्या तयार केल्या होत्या. मात्र न्यायालयीन वाद निर्माण झाल्याने मतदारयाद्या अंतिम करण्यात आल्या नव्हत्या. कोरोनाच्या कालावधीतच मतदारयाद्या तयार करण्याची सूचना निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनाला केली. त्यामुळे मनपा प्रशासनाने 2018 च्या मतदारयाद्यांच्या आधारे नवीन मतदारयाद्या तयार केल्या होत्या. तसेच मतदारयाद्यांबाबत आक्षेप नोंदवून अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. निवडणुकीपूर्वी सफार गल्लीचा परिसर वॉर्ड क्र. 49 मध्ये येत असल्याचे सांगून या वॉर्डमध्ये 6 मतदान केंदे निश्चित करण्यात आली होती. त्यानुसारच नागरिकांनी निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या मतदारयादीच्या आधारे राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. वॉर्डच्या आराखडय़ानुसार मतदारयाद्या तयार केल्या होत्या. पण सफार गल्लीचा भाग वॉर्ड क्र. 40 मध्ये येत असल्याचे सांगून वॉर्ड क्र. 49 मधील एक मतदान केंद्र कमी करून सदर मतदारयादी वॉर्ड क्र. 40 मध्ये समाविष्ट करण्यात आली असल्याचे उमेदवारांच्या निदर्शनास आले आहे.
वॉर्ड क्र. 49 मध्ये सफार गल्लीचा परिसर येत असल्याने त्या भागात उमेदवारांनी गेल्या चार दिवसांपासून प्रचारासाठी प्रत्येक घराच्या पायऱया झिजविल्या आहेत. मात्र ऐनवेळी सफार गल्लीचा परिसर वॉर्ड क्र. 40 मध्ये येत असल्याचे सांगण्यात आल्याने गेंधळ निर्माण झाला आहे. तसेच उमेदवारांनी गेल्या पाच-सहा दिवसांपासून घेतलेले परिश्रम वाया गेले आहेत. महापालिका प्रशासनाच्या बेजबाबदारपणाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेच्या अधिकाऱयांच्या निष्काळजीपणाचा फटका उमेदवारांना बसला आहे. तसेच मतदान नेमके कोणत्या वॉर्डात करायचे, असा संभ्रम मतदारांमध्ये निर्माण झाला आहे.