नवे मतदार ओळखपत्राची पीडीएफ प्रत डाऊनलोड करता येणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मतदार ओळखपत्र गहाळ किंवा खराब झाल्यास ते पुन्हा प्राप्त करण्याची प्रक्रिया दमछाक करविणारी असते. पण निवडणूक आयोगाने ही समस्या दूर केली आहे. सोमवारपासून मतदार ओळखपत्र डाऊनलोड करण्याची सुविधा प्राप्त झाली आहे. 31 जानेवारीपर्यंत केवळ मागील वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अर्ज केलेल्या मतदारांनाच ही सुविधा प्राप्त होणार आहे. एक फेब्रुवारीपासून सर्व मतदारांना ही सुविधा मिळू लागेल.
राष्ट्रीय मतदानदिनी निवडणूक आयोगाने ई-इपिक योजना सुरू केली आहे. इपिक म्हणजेच इलेक्टोरल फोटो आयडेंटिटी कार्ड आहे. याच्या माध्यमातून कुणीही स्वतःचे मतदार ओळखपत्र मोबाईलमध्ये डाऊनलोड करू शकेल. याची प्रतही काढता येणार आहे. कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी या योजनेचे अनावरण केले आहे.
ओळखपत्राची प्रतीक्षा संपणार
ही सुविधा सुरू झाल्यावर मतदार ओळखपत्राची प्रतीक्षा करावी लागणार नाही. मतदारयादीत नाव सामील होताच हे ओळखपत्र डाऊनलोड करता येणार आहे. मतदार या ओळखपत्राची प्रिंटही काढू शकेल आणि याला लॅमिनेट करणे तसेच सुविधेनुसार डिजिटल संग्रहितही करू शकणार आहे.
डिजिटल ओळखपत्राचे लाभ
ई-इपिक नव्या मतदाराला देण्यात येणाऱया प्लास्टिक मतदार ओळखपत्रापेक्षा वेगळे असेल, याला डिजिलॉकरमध्येही अपलोड करता येणार आहे. ई-इपिक डाऊनलोड करण्यापूर्वी केवायसी करावी लागेल. ही सुविधा मिळाल्यावर मतदाराला पत्त्यात बदल झाल्यास वारंवार नवे मतदार ओळखपत्र तयार करण्याची गरज नसेल. यासाठी सिंगल ई-इपिक पुरेसे ठरणार आहे. क्यूआर कोडमध्ये बदललेल्या पत्त्यासह याला नव्याने डाऊनलोड करता येणार आहे. मतदार ओळखपत्र गहाळ किंवा खराब झाल्यास त्याची दुसरी प्रत मोफत डाऊनलोड करता येणार आहे. सध्या याकरिता 25 रुपये द्यावे लागतात. या पावलाद्वारे वन नेशन-वन इलेक्शन कार्डच्या योजनेच्या दिशेने पुढे सरकता येणार आहे.
ई-इपिक डाऊनलोड कसे करणार
सर्वप्रथम ई-इपि डाऊनलोड करण्यासाठी व्होटर पोर्टल, व्होटर हेल्पलाईन मोबाईल ऍप किंवा नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टलच्या संकेतस्थळावर जावे लागेल. याचबरोबर गुगल प्ले स्टोअरवरूनही हा ऍप डाऊनलोड करता येणार आहे.