प्रतिनिधी / बेळगाव
ग्राम पंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र काही मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावेच गायब झाल्याने समस्या निर्माण झाली आहे. हिंडलगा येथील वॉर्ड क्रमांक 5 मधील मतदार यादीतून नाव कमी झाले असून येथील निवडणूकच स्थगित करावी, अशी मागणी एका महिलेने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मतदार याद्यांमध्ये बराचसा घोळ झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यापूर्वी मतदार याद्या दुरुस्तीबाबत जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले होते. काही जणांनी आपल्या तक्रारी दिल्या होत्या. मात्र तक्रारी देऊनही काही जणांची नावेच मतदार याद्यीत आली नाहीत. हिंडलगा येथील मास्तीनगर येथील सविता हेमंत हित्तलमनी या महिलेचे नावच नसल्याचे उघडकीस आले आहे. सदर महिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रयत्न करताना ही घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी त्या महिलेने जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार केली असून गेल्या दहा वर्षांपासून माजे मतदार यादीमध्ये नाव होते. मात्र अचानक त्यामधून नाव गायब झाले आहे. तलाठय़ांनी जाणूनबुजून ते नाव कमी केल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे. संबंधित तलाठय़ावर कारवाई करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.