प्रतिनिधी/ पणजी
मनपासह राज्यातील सहा पालिका, 18 ग्रामपंचायती, एक जिल्हा पंचायत व सांखळी पालिकेचा एक प्रभाग यांच्नी निवडणूक व पोटनिवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून आज दि. 20 रोजी होणाऱया निवडणुकीत सुमारे 3 लाख 09 हजार मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्याद्वारे एकूण 423 उमेदवारांचे भवितव्य सिलबंद होणार आहे.
पणजी मनपाची निवडणूक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे होणार असून उर्वरित सर्व ठिकाणी मतपत्रिकांच्या माध्यमातून मतदार आपल्या भावी लोकप्रतिनिधींची निवड करणार आहेत. वरील सर्व केंद्रात नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचाऱयांनी शुक्रवारी आपापल्या पदांचा ताबा घेत आवश्यक साहित्यासह आपली मतदान केंद्रे गाठली.
पणजीत इव्हीएमद्वारे होणार मतदान
पणजी मनपाच्या 30 प्रभागांसाठी होणाऱया निवडणुकीत मतदान यंत्रांचा वापर होणार असल्याने शुक्रवारी संबंधित अधिकाऱयांना मतदान यंत्रे वितरित करण्यात आली. त्यासाठी शहरातील फार्मासी महाविद्यालयात वितरणाची व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभरात सर्व अधिकारी व कर्मचाऱयांनी या यंत्रांचा ताबा स्वीकारत पोलीस बंदोबस्तात मतदानकेंद्रस्थानी रवाना झाले. मनपासाठी 33 ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या 67 केंद्रांवरून 32041 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यासाठी 515 अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सहा पालिकांसाठी मतपत्रिकेद्वारे मतदान
या निवडणुकीबरोबरच डिचोली, वाळपई, पेडणे, कुंकळ्ळी, कुडचडे-काकोडा आणि काणकोण या सहा पालिकांसाठीही निवडणूक होणार असून त्यात 2 लाख 82 हजार 511 मतदार मतदान करणार आहेत. त्याशिवाय 17 ग्रामपंचायतींचे 18 प्रभाग, नावेली जिल्हा पंचायत व सांखळी पालिकेचा एक प्रभाग यांच्या पोटनिवडणुकीत 27 हजार 564 मतदार आपला हक्क बजावणार आहेत.
सकाळी 8 ते सायं. 5 वाजेपर्यंत मतदान
वरील सर्व ठिकाणीही शुक्रवारीच मतदान साहित्य पोहोचते करण्यात आले व प्रत्येक ठिकाणी नियुक्त अधिकारी व पोलीस कर्मचाऱयांनी मतदान केंद्रांचा ताबा घेतला. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया प्रारंभ होणार आहे. ही प्रक्रिया सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार असून शेवटचा एक तास कोरोनाग्रस्त मतदारांसाठी राखून ठेवण्यात आला आहे.
17 पंचायतींसाठी 10514 मतदार
प्रत्यक्षात 20 ग्रामपंचायतींच्या 22 प्रभागांसाठी पोटनिवडणूक होणार होती. परंतु भिरोंडा, रिवण, चिखली व म्हाऊस या पंचायतींमधून चार उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यामुळे आता 17 पंचायतीमध्येच पोटनिवडणूक होणार असून 10 हजार 514 मतदार मतदानहक्क बजावणार आहेत.
नावेली जिल्हा पंचायतीच्या पोटनिवडणुकीत 7313 पुरूष आणि 8253 महिला मिळून एकूण 15566 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी 23 मतदानकेंद्रें स्थापन करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सांखळी पालिकेच्या क्र. 9 या ओबीसीसाठी राखीव प्रभागात होणाऱया पोटनिवडणुकीत एकूण 584 मतदार मतदान करणार आहेत.
आज भरपगारी सुट्टी
आज होणाऱया निवडणुकीत मतदान हक्क बजावता यावा यासाठी सरकारने संबंधित सर्व मतदारांना भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे. औद्योगिक कामगार, सरकारी खाती आणि राज्य सरकारच्या औद्योगिक आस्थापनातील रोजंदारी कामगार, राज्यातील सर्व खाजगी व्यावसायिक आणि औद्योगिक कामगार, खाजगी आस्थापनातील कामगार, इत्यादींसाठी ही भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे सर्वसाधारण प्रशासन खात्याचे अवर सचिव श्रीपाद आर्लेकर यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.