पात्र शिक्षकाला एका सदस्याचा विरोध : डावलायचे कसे, या मुद्यावरून उभा राहिला पेच
प्रतिनिधी / ओरोस:
पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या शिक्षकांबाबत निवड समिती सदस्यांमध्येच एकवाक्यता होत नसल्याने जिल्हा परिषदेचे यावर्षीचे आदर्श शिक्षक पुरस्कार रखडल्याची चर्चा आहे. पुरस्कार निवड समितीनेच अद्याप मंजुरी न दिल्याने पुढील कार्यवाही थांबली आहे. दरम्यान दरवर्षी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला किंवा शिक्षक दिनी जाहीर होणारे पुरस्कार जाहीर न झाल्याने जिल्हाभरातील शिक्षकांमध्ये आश्चर्याचा सूर आहे.
शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱया शिक्षकांना दरवर्षी जि. प. चा आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. प्रत्येक तालुक्यातून एक आणि कला, क्रीडा क्षेत्रासाठी विशेष एक असे एकूण नऊ पुरस्कार दिले जातात. तालुकास्तरीय निवड समितीच्या मान्यतेने प्रत्येक तालुक्यातून पात्र ठरणारे दोन किंवा काही प्रसंगी एक प्रस्ताव जिल्हास्तरावर मंजुरीसाठी पाठविला जातो. जिल्हास्तरीय निवड समितीच्या मंजुरीनंतर हे प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविले जातात. आयुक्तांची मान्यता मिळाल्यानंतर जि. प. अध्यक्षांकडून ते जाहीर केले जातात. दरवर्षी साधारणत: शिक्षक दिनापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाते.
जिल्हा परिषद अध्यक्ष हे जिल्हास्तरीय पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष आहेत. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी (उपाध्यक्ष), शिक्षण सभापती, महिला व बालविकास सभापती, समाजकल्याण सभापती, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि डाएटचे प्राचार्य आदींचा या निवड समितीत समावेश आहे.
यावर्षीच्या आदर्श पुरस्कारासाठी तालुकास्तरावरून प्राप्त झालेले प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागाकडून या निवड समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. जुलै महिन्यात संबंधितांच्या मुलाखती घेण्यात आल्या तसेच त्यांनी सादर केलेल्या प्रस्तावाचे गुणांकनही करण्यात आले. मात्र गुणांकनात सरस ठरलेल्या एका तालुक्यातील प्रस्तावाच्या नावाला निवड समिती सदस्यांमधील त्याच तालुक्यातील एका पदाधिकारी सदस्याकडून आक्षेप घेण्यात आला. गुणांकन व अन्य बाबतीतही सरस ठरलेल्या शिक्षकाला डावलायचे कसे आणि कोणत्या मुद्यावर, हा पेच निवड समितीसमोर उभा राहिला. दरम्यानच्या काळात यावर नक्कीच तोडगा निघेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र याबाबतचा वाद स्थानिक आमदारांपर्यंत पोहोचल्याने पुढील कार्यवाही ‘जैसे थे’ स्थितीत अडकून पडल्याची चर्चा आहे.