प्रतिनिधी /बेळगाव
सोमवार दि. 6 सप्टेंबर रोजी महानगरपालिकेच्या 58 वॉर्डांसाठीची मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. या पार्श्वभूमीवर खानापूर रोडवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
सोमवारी सकाळी 6 पासून मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या मार्गावरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. केवळ निवडणूक कर्तव्यासाठी जुंपण्यात आलेले पोलीस अधिकारी, निवडणूक अधिकाऱयांच्या वाहनांना या परिसरात प्रवेश असून उमेदवारांच्या वाहनांसाठी आसद खान दर्गा परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
गोवावेस सर्कल व काँग्रेस रोडवरून शहरात येणारी वाहने मिलिटरी महादेवमार्गे शौर्य चौक, गांधी चौक मार्गे वळविण्यात येणार आहेत. तर चन्नम्मा सर्कलहून खानापूर रोडकडे जाणारी वाहने चन्नम्मा गणेश मंदिराजवळून क्लब रोड, गांधी चौक, शौर्य चौक, मिलिटरी महादेव मंदिराकडून काँग्रेसरोडकडे वळविण्यात येणार आहेत.
पिंपळकट्टा, पाटील गल्ली, शनिमंदिर मार्गे खानापूर रोडकडे जाणारी वाहने कपिलेश्वर ओव्हरब्रिजवरून एसपीएम रोड, बँक ऑफ इंडिया कॉर्नर, गोवावेसकडे वळविण्यात येणार आहेत. खानापूर रोड (मंगसुळी खूट ते गोगटे सर्कल), स्वतंत्रता मार्ग (सेंट पॉल्स हायस्कूल क्रॉस ते गवळी क्रॉस व हाय स्ट्रीट), बी. के. मॉडेल रोड (पोस्टमन सर्कल ते बीएसएनएल क्रॉस) सोमवारी निर्बंधित प्रदेश असणार आहे.