ममता बॅनर्जींची सूचना
वृत्तसंस्था/ बांकुरा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या दुसऱया दिवशी सोमवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांकुरामध्ये प्रचारसभा घेतली आहे. या सभेत त्यांनी भाजपवर जोरदार शाब्दिक प्रहार केले आहेत. भाजप निवडणूक जिंकण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. राज्यात दहशत निर्माण करण्यासाठी भाजप बाहेरून गुंड आणत आहे. मतमोजणीवेळी बूथवर तैनात आमच्या पोलिंग एजंट्सनी सावध रहावे असे ममतांनी म्हटले आहे.
मतमोजणीवेळी तेथे तैनात एजंटने सिगारेट ओढू नये आणि चहाही पिऊ नये, कारण त्यात काहीतरी मिसळून दिले जाण्याची शक्यता आहे. मला पोलीस आणि सुरक्षा व्यवस्थेवर विश्वास आहे. पण तरीही मतदानयंत्रावर नजर ठेवा, पोलिसांवर पूर्ण भरवसा ठेवू नका असे ममता म्हणाल्या.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोफत धान्य पुरवठय़ाचे खोटे आश्वासन भाजप देत आहे. भाजप हा बाहेरील लोकांचा पक्ष असून राज्यात दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांना आणत आहे. भाजपचे गुंड घरोघरी जाऊन मते मागतील. त्यांनी धमकाविल्यास त्यांना हुसकावून लावण्यासाठी घरातील भांडी हातात घेऊन सज्ज रहा असे ममतांनी म्हटले आहे.
महिलांनी कोणते कपडे घालावेत, कोणता आहार घ्यावा यासाठी भाजप आदेश देत आहे. नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात मोठे नेते असल्याचा भास ते निर्माण करतील. गुजरातमध्ये एका क्रिकेट स्टेडियमला मोदींचे नाव देण्यात आले आहे. एकेदिवशी ते देशाचे नावही बदलतील. सरकारी कंपन्यांना ते खासगी हातांमध्ये सोपवत असल्याचे म्हणत ममतांनी भाजपला लक्ष्य केले आहे.