प्रतिनिधी/ बेळगाव
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 13 जून रोजी होणार असून मतमोजणी 15 जून रोजी होत आहे. या मतमोजणीसाठी बी. के. कॉलेजची पाहणी साहाय्यक निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सोमवारी केली. या कॉलेजमध्ये स्ट्राँग रूम तसेच मतमोजणी केली जाणार आहे.
मतदान झाल्यानंतर मतपेटय़ा ठेवण्यासाठी जे स्ट्राँग रूम करण्यात आले आहेत त्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 15 रोजी मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी किती कक्ष असावेत तसेच टेबलची संख्या किती असावी याची अधिकाऱयांशी चर्चा केली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार मतमोजणी केंद्र स्थापन करावेत, याचबरोबर सुरक्षाही योग्य प्रकारे ठेवावी, असे त्यांनी सांगितले.
मतमोजणी केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करावी. याचबरोबर विद्युत पुरवठा सुरळीत करणे, पार्किंगसाठी जागा याबाबतही त्यांनी सर्व माहिती घेतली. यावेळी अधिकाऱयांना त्यांनी विविध सूचनादेखील केल्या. मतमोजणी केंदे कशी असावीत, एका टेबलवर किती कर्मचारी असावेत, याची चर्चादेखील करण्यात आली. कोरोनाचे सर्व नियम पाळत ही मतमोजणी झाली पाहिजे, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर तसेच महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.