प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचे मतदान आरपीडी महाविद्यालय येथे रविवार दि. 2 मे रोजी होणार आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी या मतमोजणी केंद्रांच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार असल्याचे स्पष्ट करत या परिसरातील वाहतूक इतर मार्गावरुन वळविण्यात आल्याची माहिती एका पत्रकाद्वारे दिली आहे.
गोवावेस ते तिसरा रेल्वेगेट हा मुख्य रस्ता त्या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहे. या रस्त्यावर कोणीही वाहने पार्किंग करु नये,असेही या पत्रकात म्हटले आहे. महाराष्ट्राकडून गोव्याकडे जाणारी वाहने काँग्रेस रोडसह इतर मार्गावरुन वळविण्यात आली आहेत. कोणत्याही प्रकारे या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आरपीडी महाविद्यालयांमध्ये मतमोजणी होणार असल्यामुळे मतमोजणीसाठी येणाऱया उमेदवारासह एजंट तसेच कर्मचाऱयांनी आरपीडी महाविद्यालयाच्या प्रांगणात वाहने पार्किंग करायची आहेत. या प्रांगणाकडे जाण्यासाठी भाग्यनगर, दुसरा क्रॉस येथील गेटकडूनच प्रवेश दिला जाणार आहे. याची दखल सर्व उमेदवार व कर्मचाऱयांनी घेण्याचे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी केले आहे. कोविड चाचणी करणे बंधनकारक आहे. आपण कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल दिला पाहिजे. त्याबाबतचा अहवाल आपल्या सोबत असणे गरजेचे आहे. प्रत्येकाने सोशल डिस्टन्स ठेवूनच काम करण्याचे आहे. आतमध्ये जाताना तंबाखू, गुटखा तसेच इतर कोणत्याही धुम्रपानच्या वस्तू घेवून जावू नये. कोणाकडेही आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी कळविले आहे.