प्रतिनिधी /बेळगाव
जुना पी. बी. रोड येथे गेल्या कित्येक दिवसांपासून नाल्यालगत असलेल्या पाईपमध्ये राहणाऱया मतिमंद मुलाला जिव्हाळा फौंडेशनच्या अध्यक्षा माधुरी जाधव व हेल्प फॉर निडी संस्थेच्या रुग्णवाहिकेचे गौतम कांबळे यांनी आधार दिला.
या मुलाबाबत माहिती कळताच माधुरी जाधव यांनी त्याची चौकशी सुरू केली. अचानक त्या मुलाने तेथून पळ काढला आणि लेंडी नाल्यात उतरून तो पाईपमध्ये बसला. गौतम कांबळे यांनी नाल्यात उतरून त्याला वर आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही.
दोन तासांच्या प्रयत्नानंतर तो मुलगा घाबरलेल्या अवस्थेत पाईपमधून बाहेर आला. सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर, अनिल अष्टेकर, निलेश पाटील, भरत नागरोळी, राजेंद्र बैलूर, मुकेश राजपुरोहित, सौरभ कुंदप यांनी त्याला पाणी व खाऊ दिला. त्यानंतर खासबाग येथील पालिकेच्या निराधार आश्रय केंद्रात त्याची राहण्याची सोय करण्यात आली.