- हॉटेलमधील मेन्यूतून चायनिज पदार्थही गायब
ऑनलाईन टीम / मथुरा :
चीनने केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर चिनी पदार्थ आणि वस्तूंवर बंदी घाला, अशी मागणी संपूर्ण भारतात जोर धरू लागली आहे. त्यातच तीर्थक्षेत्र असलेल्या मथुरा वृंदावनमधील हॉटेल व्यावसायिक संघटनेने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, मथुरा वृंदावन मधील हॉटेलमध्ये चिनी नागरिकांना राहण्यास बंदी घातली आहे.
हॉटेल ओनर असोसिएशनने कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआईटी) च्या अभियानाचे समर्थन करत चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकला आहे. त्याबरोबरच हॉटेल्समध्ये चिनी नागरिकांना उतरण्यास बंदी तसेच मेन्यू कार्ड मधून चायनिज पदार्थ हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना संघटनेचे महामंत्री अमित जैन यांनी सांगितले की, मथुरा वृंदावन हॉटेल ओनर असोसिएशन सीएआईटीने सुरू केलेल्या अभियानचे समर्थन करून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकत आहे.
पुढे ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘लोकल से व्होकल’ या आव्हानाला प्रतिसाद देत ‘भारतीय सामान हमारा अभिमान’ या घोषणेला मथुरा वृंदावनातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. त्यामुळेच आम्ही चिनी उत्पादने आणि खाद्यपदार्थांवर बहिष्कार घालत आहोत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.