वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील कोरोना महामारी संकटात सापडलेल्या कोरोनाग्रस्तांसाठीच्या मदतीकरिता 11 जुलै रोजी दिल्लीच्या गोल्फ क्लबने मदतनिधी गोल्फ सामना आयोजित केला आहे. या सामन्यामध्ये अव्वल गोल्फपटू गगनजित भुल्लर, शुभंकर शर्मा तसेच भारताचे माजी क्रिकेटपटू कपिलदेव आणि मुरली कार्तिक सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
दिल्ली गोल्फ क्लबच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या गोल्फ मैदानावर मदतनिधी गोल्फ सामना 18 होल्सचा खेळविला जाणार आहे. आशियाई गोल्फ टूरवरील विजेता आणि अर्जुन पुरस्कार विजेता गगनजित भुल्लर तसेच कपिलदेव यांचे दोन संघ राहतील. या मदतनिधी गोल्फ सामन्यातून जमा होणारा निधी कोरोनाग्रस्तांसाठी दिला जाईल. किमान 1 कोटी रुपये या सामन्यातून गोळा होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. दिल्लीमध्ये आतापर्यंत 30 हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार चालू आहेत.