प्रतिनिधी / कुर्डुवाडी
मध्यधुंद अवस्थेतील ट्रक चालकाने भरधाव वेगात गाडी चालवून रस्त्यात दोघांना ठोकरले तर एकाने बचावासाठी झुडपात उडी मारली. ही घटना दि. २६ रोजी सायं. ७.३० ते ७.४५ च्या दरम्यान करमाळा – कुर्डुवाडी रस्त्यावर घडली.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार. मध्यधुंद अवस्थेत उसाने भरलेला ट्रक ( एम एच १८ एम ८६६९) घेऊन ट्रकचालक करमाळा – कुर्डुवाडी रस्त्याने भरधाव वेगात निघाला असता कुर्डुवाडीकडून बारलोणी कडे जाणाऱ्या मोटारसायकलस्वार गुरुनाथ राऊत वय २६ ( रेल्वे कॉलनी कुर्डुवाडी ) याला धडक देऊन तसाच पुढे जात आणखी एकाला धडकणार तोच त्याने प्रसंगावधान राखत झुडपात उडी मारली. पुढे जाऊन कुर्डुवाडी – बार्शी रोडवरील बाह्यवळणावर दत्तात्रय जानराव यांच्या एका नव्या रिक्षाला (एम एच ४५ ए इ ०३६०.) ला धडकून पुढे जात असताना नागरिकांनी ट्रक थांबवून मद्यधूंद अवस्थेतील चालकास पोलिसांच्या स्वाधीन केले.
जखमी गुरुनाथ यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे त्याचे नाव समजू शकले नाही. याबाबत कुर्डुवाडी पोलिसांत उशीरापर्यंत नोंद झाली नव्हती.