अबकारी करात 11 टक्के वाढ : दोन दिवसांपूर्वीच वाढविला होता 6 टक्के कर
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मोठय़ा प्रमाणात आर्थिक फटका बसल्याने राज्य सरकारने महसूल जमा करण्यासाठी वेगवेगळय़ा पर्यायांचा अवलंब केला आहे. आंधप्रप्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल राज्यांप्रमाणेच कर्नाटकातही मद्यावरील अबकारी करात 11 टक्के वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी 6 टक्के करवाढ लागू करण्यात आली होती. आता पुन्हा कराचा बोजा वाढविण्यात आला आल्याने मद्यप्रामींना झटका बसला आहे.
लॉकडाऊनमुळे सरकारी अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे महसूल जमा करण्यासाठी सरकारने मद्यावरील अबकारी करवाढ केली आहे. बुधवारी याबाबतचा अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. यापूर्वी मद्यावर 5 टक्के कर आकारला जात होता. मंगळवारी 6 टक्के आणि बुधवारी 11 टक्के करवाढ झाल्याने मद्यासाठी 17 टक्के कर भरावा लागणार आहे.
दोन दिवसांत 13 टक्के करवाढ लागू झाल्याने मद्यप्रेमींना अधिक भार पेलावा लागणार आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी अर्थमंत्री या नात्याने मार्च महिन्यात अर्थसंकल्प मांडला होता. त्यावेळी 1 एप्रिलपासून अबकारी करात 6 टक्के वाढ करण्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 24 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जारी झाल्याने ही करवाढ लागू करणे शक्य झाले नव्हते. सोमवारपासून लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करून मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली होती.