सोमवारपासून अटींसह दुकाने उघडण्यास परवानगी
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारी थोपविण्यासाठी गेल्या चाळीस दिवसांपासून दारू दुकाने बंद ठेवण्यात आली होती. आता सोमवारी 4 मेपासून ती उघडण्यासाठी राज्य सरकारने सामाजिक अंतरासह सशर्त अटींचे बंधन घालून परवानगी दिली आहे. त्यामुळे सोमवारपासून तळीरामांची होणारी तगमग संपुष्टात येणार आहे.
अबकारी विभागाचे आयुक्त डॉ. लोकेश एम. यांनी शनिवारी सायंकाळी या संबंधीचा आदेश जारी केला आहे. सीएल-2 (वाईन शॉप) व सीएल 11-सी (एमएसआयएल) दुकानांतून दारू विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. रोज सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत ही दुकाने उघडी असणार आहेत.
3 मेच्या मध्यरात्रीपर्यंत दारू विक्री बंदीचा आदेश जारी होता. आता 4 मेपासून दारू दुकाने उघडण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या मार्गसूचीनुसार राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून जे परिसर निर्बंधित प्रदेश (कन्टेन्मेंट झोन) म्हणून घोषित करण्यात आले आहेत, त्या परिसरात ही मुभा राहणार नाही.
निर्बंधित प्रदेश वगळता वाईन शॉप, एमएसआयएलची दुकाने व केएसबीसीएलचे डेपो उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत निर्बंधित प्रदेशात दुकाने उघडू नयेत, अशी स्पष्ट सूचना या आदेशात देण्यात आली आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंतच दुकाने उघडण्यात यावीत. या दुकानात एका वेळी केवळ पाच ग्राहकांनाच थांबण्याची मुभा आहे. किमान सहा फुटांचे अंतर पाळावे, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.
वाईन शॉप व एमएसआयएलमध्ये काम करणारे कामगार व खरेदीसाठी येणाऱया तळीरामांना मास्क परिधान करणे सक्तीचे आहे. या बरोबरच सॅनिटायझरचाही वापर करावा. केवळ पार्सलची सोय असणार आहे. मॉल किंवा सुपरमार्केटमधील दुकाने उघडण्यास परवानगी नाही. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांचा परवाना निलंबित किंवा रद्द करण्यात येईल, असा इशारा अबकारी आयुक्तांनी दिला आहे.
सरकारला मोठा फटका!
गेले चाळीस दिवस मद्यविक्री बंद असल्यामुळे राज्य सरकारला मोठा फटका बसला आहे. मद्यविक्रीच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात महसूल येतो. महसुलाचा मार्गच बंद झाल्यामुळे सरकारी कर्मचाऱयांचे पगार करणेही कठीण जात होते. याबरोबरच दारू दुकाने उघडण्यासाठी मागणी वाढली होती. याचा विचार करून सामाजिक अंतरासह सात प्रमुख अटींवर सोमवारपासून दारू विक्री सुरू करण्यात येणार आहे.