ईडीची बदनामी टाळण्यासाठी संपूर्ण कारणाम्यांची होणार कसून चौकशी : सीआयडीने प्रयत्न करूनही लागला नव्हता थांगपत्ता
प्रतिनिधी / बेळगाव
ईडी (सक्तवसुली संचालनालय) च्या नावे बँकांना नोटिसा पाठवून ग्राहकांचे बँक खाते गोठविण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरून येथील सीईएन विभागाच्या अधिकाऱयांनी अटक केलेल्या महाभागाची कसून चौकशी सुरू आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी घेवून त्याला दहा दिवसांसाठी पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.
बुधवारी सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी मधुकर विलास सापळे (वय 31, रा. शास्त्राrनगर) याला अटक केली होती. केवळ ईडीच्या नावे बँकांना पत्रे पाठविणेच नव्हे तर या ठकसेनने इन्शुरन्स कंपनीच्या ग्राहकांनाही 26 लाखांना ठकविल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले होते.
नवी दिल्ली येथील ईडीच्या अधिकाऱयांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून ईडीची बदनामी टाळण्यासाठी त्याची कसून चौकशी करण्याची सूचना पोलिसांना केली आहे. याबरोबरच कोणत्याही परिस्थितीत संबंधित बँक ग्राहकांना त्रास होवू नये याची खबरदारीही घेण्यात येत आहे.
उपलब्ध माहितीनुसार हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ईडीने राज्य पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून चौकशीची सूचना केली होती. या प्रकरणाची चौकशी सुरुवातीला सीआयडी विभागाकडे सोपविण्यात आली होती. सीआयडीच्या स्थानिक अधिकाऱयांनी संबंधित बँक व्यवस्थापक व ग्राहकांना बोलावून त्यांची चौकशी करण्यात आली. मात्र नोटिसा पाठविणारा कोण? याचा उलगडा झाला नव्हता.
फसवणुकीचाच प्रकार
चौकशीअंती फसवणुकीचाच हा प्रकार आहे. त्यामुळे एफआयआर दाखल करावे, असा सल्ला देत सीआयडीच्या अधिकाऱयांनी राज्य पोलीस महासंचालकांना या प्रकरणाची माहिती पाठविली होती. मात्र नोटिसा पाठविणारा कोण? याचा तपास लागला नव्हता. तपासाअंती येथील सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केले होते. तेंव्हाही ईडीच्या नावाने बेळगावात गोंधळ माजविणारा कोण? याचा उलगडा झाला नव्हता.
सीईएन विभागात दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला. ज्या ग्राहकांच्या नावे ईडीच्या नोटिसा बँकांना पाठविण्यात आल्या आहेत त्या ग्राहकांना बोलावून त्यांच्याकडून माहिती जमविण्यात आली. तुमची बँक खाती कोठे आहेत? तसेच अकाऊंट क्रमांक किती आहे याची माहिती अन्य कोणाला दिला आहात का? याची विचारणा करताना बहुतेक ग्राहकांच्या तोंडातून मधुकर सापळे याचे नाव आले. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावून तेंव्हापासूनच त्याचा पाठलाग सुरू करण्यात आला होता. बुधवारी त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलीसही होते ग्राहक
मधुकर सापळेने इन्शुरन्स कंपनीच्या नावेही अनेकांना ठकविले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इन्शुरन्सही काही कामासाठी त्याचे ग्राहक होते, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. सारे कोरोना महामारीमुळे ओढवलेल्या संकटात होते तर हा महाभाग ईडीच्या नावाने बँकांना नोटिसा पाठविण्याबरोबरच इन्शुरन्स कंपन्यांच्या ग्राहकांना ठकविण्यात मग्न होता. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.