प्रतिनिधी/ सातारा
येथील मधुमिता अभिजित वाईकर दिग्दर्शित ‘राईस प्लेट’ या विनोदी शॉर्ट]िफल्मला इंडियन स्टार इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट विनोदी शॉर्टफिल्मचा पुरस्कार मिळाला. मधूमिता कला अकादमी संचलित अभिव्यक्त अभिनय व नृत्य शाळेतर्फे निर्माण केलेली ही शॉर्टफिल्म अभि वाईकर फिल्म्स या युटय़ुब चॅनेलवर प्रदर्शित केली आहे. त्याचे दिग्दर्शन मधुमिता वाईकर हिने केले आहे.
राईसप्लेट या शॉर्टफिल्म मध्ये खाद्य संस्कारातील अनावश्यक दिखाऊपणा, सोपस्कार यावर मार्मिक भाष्य केले आहे व पोटाच्या भुकेसाठी आवश्यक दोन घासांची किंमत काय असते याबाबतचा मिश्कीलपणे संदेश ही शॉर्टफिल्म देते. बलराम कलबुर्गी, किशोरी क्षीरसागर, ओंकार ताटे, कोमल मोरे, वनराज कुमकर, संजीव आरेकर, प्रतीक्षा जंगम, गायत्री केळकर, वैशाली जेबले, हिमांशू व खुशी जेबले, संजीव आरेकर व इतर कलाकारांनी यात अभिनय केला आहे. कॅमेरामन राहुल भोंडे असून संकलन तथा संगीत संयोजन आशिष पुजारी व अभिजित वाईकर यांनी केले आहे.
इंडियन स्टार इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये 92 फिल्म्स भारतातून तर 16 फिल्म्स इटली, फ्रांस, अमेरिका, रशिया, कुर्दीस्तानातून सहभागी झाल्या होत्या. त्यातून बेस्ट 50 फिल्मना नामांकन मिळाले. ज्युरी म्हणून अरुण नलावडे, शिरीष राणे, अनिकेत के. यांनी काम बघितले. ही शॉर्टफिल्म अभि वाईकर फिल्म्स या युटय़ुब चॅनेलवर उपलब्ध आहे. आगामी ‘गुगलगाव वायफाय’ या रोमँटिक विनोदी वेबसिरीज मधून मधूमिता नव्या मजेदार भूमिकेत रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी लवकरच येत आहे.