हुबळी येथील कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश
वार्ताहर /हुबळी
माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांचे पुत्र आणि शिमोगा जिल्हय़ातील सोरब मतदारसंघाचे माजी आमदार मधू बंगारप्पा यांनी शुक्रवारी निजदला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मागील वर्षभरापासून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होत होती. अखेर त्यांनी काँगेस राज्य प्रभारी रणदीप सुर्जेवाला, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, विधानसभा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आदी नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.
हुबळीतील गोकुळ गार्डन येथे शुक्रवारी कर्नाटक काँग्रेस विभागाची बैठक झाली. याप्रसंगी मधू बंगारप्पा यांनी आपल्या समर्थकांसमवेत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. धारवाड, हुबळी येथील काही नेतेही देखील काँग्रेसमध्ये दाखल झाले. मार्च 2021 मध्ये मधू बंगारप्पा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे त्यांना त्यावेळी अधिकृतपणे काँग्रेसप्रवेश करणे शक्य झाले नव्हते. 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत सोरब मतदारसंघातून ते निजदच्या तिकिटावर विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला होता.
शिमोग्यात काँग्रेसला बळकटी
शिमोगा जिल्हय़ात निजदचे युवा नेते म्हणून मधू बंगारप्पांची ओळख होती. 2018 च्या निवडणुकीत निजद-काँग्रेस युतीचे उमेदवार म्हणून ते रिंगणात होते. आता त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे शिमोगा जिल्हय़ात काँग्रेस पक्ष आणखी बळकट झाला आहे. तर निजदला मोठा धक्का बसला आहे.