तुर्कस्तानात सर्वाधिक हानी, सीरियातही हाहाकार
अंकारा / वृत्तसंस्था
मध्यपूर्वेतील तुर्कस्तान आणि सीरिया या देशांना भूकंपाचा भीषण हादरा बसला आहे. सोमवारी पहाटे झालेल्या 7.8 रिश्टर क्षमतेच्या या भूकंपात दोन्ही देशांमधील मिळून 2,300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून हजारो इमारती भुईसपाट झाल्या आहेत. या इमारतींच्या ढिगाऱयांखाली अद्याप हजारो लोक अडकलेले असल्याने मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. सहाय्यता कार्याला प्रारंभ करण्यात आला आहे. पहिल्या प्रचंड दणक्यानंतर तीन तासांच्या अंतरातच आणखी एक प्रचंड हादरा बसला. त्यानंतर काही तासांनी तिसरा भूकंप झाला. यामुळे पहिल्या धक्क्याने मोडकळीस आलेल्या अनेक इमारती धाराशायी झाल्या. दोन्ही देशांमधील स्थिती गंभीर असून भारताने तेथे आपत्कालीन साहाय्यता पथक धाडण्याचा निर्णय घेतला आहे. या दुर्घटनेत 30 ते 40 हजार जण जखमी झालेले आहेत. या भूकंपाचे केंद्र तुर्कस्तानातील गाझियानटेप शहराच्या उत्तरेला होते. धक्के इजिप्तची राजधानी कैरो ते इराणपर्यंत जाणवले, अशी माहिती देण्यात आली.
निसर्गाच्या या प्रकोपात सर्वाधिक हानी तुर्कस्तानची झाली. या देशातीत मृतांची संख्या आतापर्यंत 1,494 हून अधिक आहे. किमान चाळीस हजार इमारती कोसळल्या असून यात सरकारी आस्थापने, शाळा, महाविद्यायले, सरकारी कार्यालये, आणि मशिदी यांचा समावेश आहे. किमान 600 मशिदी पूर्णतः कोसळल्या असल्याचे प्राथमिक अनुमान आहे. रुग्णालयेही हानीग्रस्त झाल्याने रुग्णांवर ठेवण्यासही जागा उरलेली नाही, अशी दुर्दशा झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. सीरियाच्या तुर्कस्तानला लागून असलेल्या भागातही मोठय़ा प्रमाणात हानी झाली असून 805 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आतापर्यंत देण्यात आली आहे. या देशातील किमान 12 हजार इमारती कोसळल्या असून वीज पुरवठा तुटल्याने साहाय्यता कार्यात अडथळे येत आहेत. सुरक्षित राहिलेले नागरिक एकमेकांना साहाय्य करीत असून जमेल त्या प्रमाणात प्रशासनालाही हातभार लावत आहेत
लेव्हल 4 सुरक्षा अलार्म
तुर्कस्तान सरकारने लेव्हल 4 चा अलार्म दिला असून तो सर्वोच्च मानला जातो. सरकारी यंत्रणा वेगाने कामाला लागल्या आहेत. काही ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याने आगी लागल्या असून अग्निशमन दल त्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. ढिगाऱयांखाली दबलेल्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शक्य तितके सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. नागरिकही ढिगारे उपसण्यासाठी कार्य करीत आहेत. सीरियाच्या अल्लेप्पो येथे अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या. वाचलेल्या इमारतींमध्ये बेघरांची व्यवस्था करण्यात येत आहे.
स्थलांतरितांचे हाल
सीरियाच्या गृहयुद्धामुळे विस्थापित होऊन तुर्कस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या असंख्य स्थलांतरितांना या भूकंपाची प्रचंड झळ पोहचली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू या स्थलांतरितांच्या वसाहती असलेल्या भागामध्येच होता. या वसाहतींमधील परिस्थिती हलाखीची असून विस्थापितांना कच्च्या इमारतींमध्ये ठेवण्यात आले होते. या इमारती कोसळल्याने आता त्यांची अवस्था बेघर झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्थलांतरितांसाठी अन्न आणि औषधेही अपुरी पडत आहेत. त्यांच्यापैकी किती जणांचा मृत्यू झाला याची अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. या स्थलांतरितांनाही साहाय्यता दिली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
भारत साहाय्यता पाठविणार
भारताने तुर्कस्तान आणि सीरिया येथे आपत्कालीन सहाय्यता पथके, डॉक्टर्स आणि सहाय्यता सामग्री पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तसा आदेश संबंधित विभागांना देण्यात आला. आज मंगळवारपासून ही सहाय्यता पाठविण्यात येणार आहे. धान्य आणि औषधेही भारत पाठविणार आहे. दोन जहाजे सज्ज ठेवण्यात आली आहेत. तसेच विमानांनी सहाय्यता पाठविण्यात येणार आहे. दोन्ही देशांच्या सरकारांशी भारताचा संपर्क असून त्यांच्या आवश्यकता लक्षात घेतल्या जातील. अंकारामधील भारताचा दूतावास तुर्कस्तान सरकारशी चर्चा करीत आहे. सीरियाच्या प्रशासनाशीही सहाय्यतेविषयी आवश्यक ती बोलणी करण्यात येत आहेत.
पंतत्रधान मोदींचा संदेश
या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करणारा संदेश पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर प्रसारित केला आहे. या कठीण स्थितीत भारत आपल्यामागे ठामपणे उभा आहे. भारताकडून सहाय्यता पाठविण्यात येत आहे. आपली हानी सहन करण्याचे बळ परमेश्वर आपल्याला देवो. भारत आपल्याला सहाय्यता करण्यासाठी सदैव सज्ज आहे, असे पंतप्रधान मोदींनी या संदेशात पुढे स्पष्ट पेले आहे.
पाठोपाठ तीन धक्के
सोमवारी पहाटेपूर्वी साधारणतः तीन वाजण्याच्या आसपास भूकंपाचा पहिला धक्का बसला. त्यावेळी लोक झोपेत होते. त्यामुळे अनेकांना घरांमधून बाहेर पडण्यासही उसंत मिळाली नाही. उंच इमारतींमध्ये वरच्या मजल्यांवर राहणाऱया लोकांना घराबाहेर पडताना प्रचंड त्रास झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी स्पष्ट केले. त्यानंतर तीन तासांनी दुसरा मोठा धक्का बसला जो 7.6 रिश्टर क्षमतेचा होता. त्यानंतर तिसरा धक्का काहीसा सौम्य (6 रिष्टर क्षमता) होता. यांमध्ये अनेक सौम्य हादरे बसले असून आणखी एक दोन दिवसांमध्ये पुन्हा भूकंपाची शक्यता आहे.
आधी कल्पता होती ?
असा विनाशकारी भूकंप होणार आहे, याची पूर्वसूचना एका संशोधकाने डिसेंबरमध्येच दिली होती, अशी माहिती तुर्कस्तानच्या सरकारी वृत्तपत्राने दिली आहे. त्याचप्रमाणे प्रँक हुगरबीट या हॉलंडच्या संशोधकानेही असा इशारा चार दिवसांपूर्वी दिला होता. 5 फेब्रुवारीला भूकंप होईल, असे हुगरबीट यांचे म्हणणे होते. ते पुष्कळसे खरे ठरले आहे. त्यांच्या सूचनेनुसार तुर्कस्तान सरकारने काही तयारी केली होती. तथापि, या उत्पाताच्या प्रमाणाचे अनुमान काढता आले नव्हते. त्यामुळे पूर्व तयारी अपुरी पडली असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
1939 नंतर प्रथमच
तुर्कस्तानला 1939 मध्ये प्रचंड भूकंपाचा धक्का बसला होता. त्यावेळी जबर जीवीतहानी झाली होती. एकंदर 33,000 माणसे ठार झाली होती. रिष्टर प्रमाणानुसार हा त्यानंरचा दुसरा इतका मोठा भूकंप आहे. तुर्कस्तान हा देश जगाच्या अतिभूकंपप्रवण भागात असल्याने नेहमी येथे हा धोका असतो. हा भूकंप शहरी भागाच्या जवळ झाल्यानें जीवीत आणि मालमत्ताहानी मोठी झालेली आहे.