ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्यप्रदेशचे जलसंपदा मंत्री तुळशीराम सिलावट यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सहा महिन्यांपूर्वी विधानसभेचे सदस्यत्व न घेता ते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात सामील झाले होते. घटनात्मक तरतुदींचा हवाला देत सिलावट यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
सिलावट यांनी मंगळवारी (दि.20) आपला राजीनामा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे पाठवला आहे. आज हा राजीनामा प्रसारमाध्यमांसमोर आला. पोटनिवडणुकीपूर्वी मध्यप्रदेशच्या राजकारणात अनेक घडामोडी झाल्या. मुख्यमंत्री चौहान यांच्या मंत्रिमंडळात सिलावट आमदारकीशिवाय मंत्री झाले. नियमानुसार एखादी व्यक्ती आमदारकीशिवाय केवळ सहा महिने मंत्री बनू शकते.
मध्यप्रदेशात 28 जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजप सिलावट यांना इंदूरमधील संवेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देणार आहे. त्यांना काँग्रेसचे प्रेमचंद गुड्डू यांचा सामना करावा लागणार आहे. 3 नोव्हेंबरला ही निवडणूक असून, 10 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.