ऑनलाईन टीम / भोपाळ :
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना गुरुग्राम मधील मेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांपासून कमलनाथ यांना ताप, सर्दी जाणवत होती. तसेच त्यांच्यामध्ये कोरोनाचे सौम्य लक्षणे देखील दिसून आली. त्यामुळे सकाळी 10 वाजता तपासणी करण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करून घेतले आहे. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
- इंदूरमधील लिफ्ट अपघातानंतर तब्येत ढासळली
फेब्रुवारी महिन्यात, माजी मुख्यमंत्री कमलनाथ मध्य प्रदेशातील इंदूर येथील खासगी रुग्णालयात लिफ्ट पडण्याच्या अपघातातून बचावले होते. त्यावेळी, अपघाताच्या परिणामामुळे घाबरून गेल्यामुळे त्यांची तब्येत ढासळली होती. त्यानंतर रुग्णालयातच त्यांचा रक्तदाब तपासण्यात आला होता.
- 2018 मध्ये मुख्यमंत्री पदी
मध्यप्रदेशमध्ये 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले होते. काँग्रेस नेता कमलनाथ मुख्यमंत्री झाले होते. मात्र, काँग्रेसमधील बंडखोरीमुळे एका वर्षातच काँग्रेस सरकार पडले. त्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात भाजपने प्रदेशात सरकार स्थापन केले.