ऑनलाईन टीम / लखनऊ :
मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे आज सकाळी निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. लखनऊ येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लालजी यांचे पुत्र आणि उत्तरप्रदेशातील मंत्री आशुतोष टंडन यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.
आशुतोष टंडन यांनी आज सकाळी 7 वाजता ‘बाबूजी अब नही रहे’ असे ट्विट केले आहे. लालजी टंडन यांच्यावर लखनऊच्या गुलाला घाट येथे आज सायंकाळी ४.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
लालजी यांना ताप आणि श्वसनाचा त्रास होत असल्याने 11 जुलै रोजी त्यांना लखनऊच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 13 जुलैला त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्याची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सोमवारी रात्री त्यांची प्रकृती आणखी खालावली, त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. मेदांताचे संचालक डॉ. राकेश कपूर यांनी याबाबतची माहिती दिली.