15-20 आमदार संपर्कात असल्याचा भाजपचा दावा : काँग्रेसकडून ‘डॅमेज कंट्रोल’ला प्रारंभ, सिंधियांची भूमिका महत्त्वाची ठरणार
वृत्तसंस्था / भोपाळ
मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या कमलनाथ सरकारवर संकटाचे ढग घोंगावू लागले आहेत. पक्षाचे अनेक आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेमुळे राज्य सरकार अडचणीत आले आहे. तर काँग्रेसने बंडखोरी रोखण्याच्या दिशेने पावले उचलत सरकारला कुठलाच धोका नसल्याचा दावा केला आहे. तर भाजप नेते नरोत्तम मिश्रा यांनी काँग्रेसचे 15-20 आमदार संपर्कात असल्याचे म्हटले आहे.
तत्पूर्वी मंगळवारी रात्री उशिरा काँग्रेसच्या 10 आमदारांनी भाजपच्या गोटात
शिरकाव केल्याचे वृत्त समोर आल्यावर मध्यप्रदेशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. भाजपने
काँग्रेस आणि काही अपक्ष आमदारांना दिल्लीत हलविण्यासाठी विमान आरक्षित केले आहे. यातील
6 आमदार परतले असून राज्य सरकारला कुठलाच धोका नसल्याचा दावा काँग्रेस नेते दिग्विजय
सिंग यांनी केला
आहे.
..तर सरकार कोसळणार
भाजप नेते मिश्रा यांच्या नव्या दाव्याने मात्र काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. काँग्रेस आमदार जनतेची कामे होत नसल्याने नाराज आहेत. यातील 15-20 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास विधानसभेत त्याचा आकडा 117 म्हणजेच बहुमतापेक्षा एकने वाढणार आहे. अशा स्थितीत मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार कोसळणार हे निश्चित.
कमलनाथ यांचा आरोप
माफियांच्या मदतीने भाजप मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. विधानसभेत काँग्रेसला पूर्ण बहुमत असून अर्थसंकल्प संमत करविण्यासह सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत ते सिद्धही केल्याचा दावा कमलनाथ यांनी केला आहे.
राज्यसभा निवडणुकीचा संदर्भ
मध्यप्रदेशच्या राजकारणात खळबळ निर्माण करण्यामागे सरकार पाडविणे नसून राज्यसभा निवडणुकीचे कारण असल्याची चर्चा आहे. मध्यप्रदेशातील 3 राज्यसभा जागांसाठी निवडणूक होणार आहे. या तीन जागांचे सध्या दिग्विजय सिंग (काँग्रेस), सत्यनारायण जटिया आणि प्रभात झा (दोघेही भाजप) प्रतिनिधित्व करत आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या दिग्विजय यांची राज्यसभेवर पुन्हा जाण्याची इच्छा आहे. तर गुना लोकसभा मतदारसंघात पराभूत झालेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळू शकते.
मध्यप्रदेश विधानसभेतील संख्याबळ
सरकार स्थापन केल्यापासूनच मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार संकटाच्या छायेत राहिले आहे. आमदारांच्या पक्षत्यागाच्या शक्यतेमुळे कमलनाथ सरकारची झोपच उडाली आहे. मध्यप्रदेशातील 230 सदस्यीय विधानसभेत सध्या 2 जागा रिक्त आहेत. काँग्रेसचे 114 आमदार असून 4 अपक्ष, 2 बसप तसेच 1 सप आमदाराचा पाठिंबा प्राप्त आहे. अशाप्रकारे काँग्रेसला एकूण 121 आमदारांचे समर्थन मिळाले आहे. तर भाजपचे 107 आमदार आहेत.
भाजपकडून हालचाली
भाजपही स्वतःकडे असलेल्या दोन्ही जागा कायम राखू पाहत आहे. राज्यसभेत स्वतःचे बळ वाढविण्याचा भाजपचा प्रयत्न लपून राहिलेला नाही. मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या आमदारांची संख्या कमी झाल्याने त्याची ‘क्रॉस व्होटिंग’वर भिस्त आहे. तर आमदाराने क्रॉस व्होटिंग केल्यास त्याची पक्षातून हकालपट्टी करत विधानसभा सदस्यत्व संपुष्टात आणले जाईल, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.