मॉल्स, स्विमिंग पूल, जिम, योग केंद्र 100 टक्के क्षमतेने सुरू
वृत्तसंस्था/ इंदोर
मध्यप्रदेश सरकारने राज्यातील कोरोना महामारीशी संबंधित सर्व निर्बंध पूर्णपणे हटवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी दुपारी 12 वाजल्यापासून नवीन नियम लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली. या निर्णयानुसार आता सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक आणि धार्मिक मेळावे पूर्ण क्षमतेने उघडण्यास परवानगी दिली जाईल. राज्यात सभा, समारंभ, विवाह आणि अंत्यविधी आता कोणत्याही निर्बंधाशिवाय करता येणार आहेत. तसेच रात्रीपासून नाईट कर्फ्यूही उठवला असून सिनेमा हॉल, मॉल्स, स्विमिंग पूल, जिम, योग केंद्र, रेस्टॉरंट्स, क्लब, शाळा, कॉलेज, वसतिगृहे, कोचिंग क्लासेस 100 टक्के क्षमतेने सुरू करता येतील.
राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. राज्यात आता केवळ 78 सक्रिय रुग्ण असल्यामुळे आम्ही राज्यातील सर्व कोरोना निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच लसीकरण मोहीमेला गती देण्याबरोबरच नवीन संसर्गबाधितांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी कोविड नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यापुढेही मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य असेल. सर्व दुकानमालक, वसतिगृहातील 18 वर्षांवरील विद्यार्थी, शिक्षक आणि सिनेमा हॉल कर्मचाऱयांना पूर्णपणे लसीकरण करण्याचे निर्देश पुन्हा एकदा देण्यात आले आहेत.