मुख्यमंत्र्यांकडून तातडीची बैठक ः जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना हटविले
वृत्तसंस्था / मुरैना
मध्यप्रदेशच्या मुरैना येथे विषारी मद्याचे प्राशन केल्याने 20 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी तातडीची बैठक घेत मुरैनाचे जिल्हाधिकारी अनुराग वर्मा आणि पोलीस अधीक्षक अनुराग सुजातिया यांना हटविण्याचा आदेश दिला आहे. तर एका अधिकाऱयाला निलंबित करण्यात आले आहे. 5 वर्षांपूर्वी मुरैनाच्या विसंगपुरा-मानपूर गावात मद्यबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. याच गावात विषारी मद्यामुळे 3 दिवसांमध्ये 20 जणांना जीव गमवावा लागला आहे.
याप्रकरणी प्रभारी अबकारी अधिकारी जावेद खां आणि पोलीस स्थानक प्रभारी अनिवाश राठौड समवेत दोन जणांना निलंबित करण्यात आले. तर विषारी मद्यविक्रीप्रकरणी 7 जणांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतले आहे.
राज्यात मागील 9 महिन्यांमध्ये विषारी मद्यामुळे 38 जणांचा मृत्यू झाला आहे. शासकीय व्यवस्था मद्याचा अवैध व्यवसाय रोखण्यास अपयशी ठरली आहे. 15 ऑक्टोबर रोजी उज्जैनमध्ये विषारी मद्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मद्याच्या अवैध निर्मितीस्थळांवर छापे टाकण्यात आले होते.