ऑनलाईन टीम / खांडवा :
मध्यप्रदेशातील खांडवा जिल्ह्यात न्यायिक अधिकारी आणि त्यांची पत्नी यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सोमवारी जिल्हा न्यायालयातील अजून एका कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोर्टातच कोरोनाचा शिरकाव झाल्याने खबरदारी म्हणून 86 न्यायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःला 14 दिवसांसाठी होम क्वारंटाइन केले आहे.
तसेच मंगळवारपासून पुढील आदेश मिळेपर्यंत कोर्टात कोणत्याही प्रकरणावर सुनावणी होणार नाही. तर अत्यावश्यक केसेसची सुनावणी बुरहानपूरमध्ये केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यायिक अधिकाऱ्यांना 5 जूनला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर 7 जूनला त्यांच्या पत्नी देखील पॉझिटिव्ह आढळल्या. त्यामुळे त्यानंतर आरोग्य विभागाने त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते.
दरम्यान, बुरहानपूरातील जिल्हा सत्र न्यायाधीश वीरेंद्र एस पाटीदार यांना जिल्ह्यातील प्रभारी न्यायाधीश म्हणून नियुक्त केले आहे. तर जिल्हा न्यायालयातील जे कर्मचारी क्वारंटाइन नाही आहेत त्यांना कोर्टात जाण्याची परवानगी दिली आहे. हे कर्मचारी ऑनलाइन अर्ज न्यायालयापर्यंत पोहोचवतील.